अमळनेर नगर परिषद निवडणूक जाहीरनाम्याची अंमलबजावणी सुरू; विवाह नोंदणी अधिकारासाठी पुण्यात उच्चस्तरीय पाठपुरावा
1 min read

अमळनेर नगर परिषद निवडणूक जाहीरनाम्याची अंमलबजावणी सुरू; विवाह नोंदणी अधिकारासाठी पुण्यात उच्चस्तरीय पाठपुरावा

Loading


अमळनेर नगर परिषद निवडणूक जाहीरनाम्याची अंमलबजावणी सुरू; विवाह नोंदणी अधिकारासाठी पुण्यात उच्चस्तरीय पाठपुरावा

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगर परिषद निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेकडे प्रत्यक्ष पावले टाकण्यास सुरुवात झाली असून, शहरासाठी महत्त्वाचा मानला जाणारा विवाह नोंदणीचा अधिकार पुन्हा नगर परिषदेकडे वर्ग करण्याचा विषय आता प्रशासकीय स्तरावर गती घेताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार शिरीष दादा चौधरी आणि नगर परिषद अध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या पुढाकारातून या वचनपूर्तीची औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे.

या संदर्भात आज पुणे (औंध) येथे आरोग्य उपसंचालक डॉ. कमलापुरकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. अमळनेर नगर परिषदेकडे विवाह नोंदणीचा अधिकार पुन्हा वर्ग करण्यात यावा, या मागणीसाठी अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांचे अधिकृत पत्र घेऊन नगरसेविका कल्पना शर्मा आणि माजी नगरसेवक मुन्नाभाऊ शर्मा यांनी उपसंचालकांची भेट घेत पाठपुरावा केला.

बैठकीदरम्यान विवाह नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचाही ऊहापोह करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयांमध्ये क्यूआर कोड प्रणाली उपलब्ध नसणे, तसेच काही डॉक्टरांकडून येणाऱ्या तक्रारी या बाबी अधिकाऱ्यांनी मान्य केल्या. या अडचणी दूर करण्यासाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले; मात्र अपेक्षित यश अद्याप मिळाले नसल्याची कबुलीही देण्यात आली.

आज सादर करण्यात आलेल्या निवेदनाच्या आधारे हा विषय वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन उपसंचालकांनी दिले. तसेच माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी नगरविकास मंत्र्यांकडे विशेष पाठपुरावा केल्यास हा विषय तातडीने मार्गी लागू शकतो, असेही सूचित करण्यात आले.

पुढील टप्प्यात शिरीष दादा चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या शिष्टमंडळासह एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेऊन निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार विवाह नोंदणीचा अधिकार त्वरित अमळनेर नगर परिषदेकडे वर्ग करण्यासाठी ठोस आणि प्रभावी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

“जोपर्यंत अमळनेर नगर परिषदेला विवाह नोंदणीचा अधिकार मिळत नाही, तोपर्यंत पाठपुरावा थांबणार नाही,” असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या हालचालींमुळे शहरातील नागरिकांना भविष्यात विवाह नोंदणीसाठी स्थानिक स्तरावरच सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जय महाराष्ट्र!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *