युवकांनी पुढे यावे, पर्यावरण वाचवावे — पक्षीमित्र अश्विन पाटील यांचे आवाहन , धनदाई महाविद्यालयाच्या NSS श्रमसंस्कार शिबिरात ‘पर्यावरण संवर्धन’ विषयावर प्रभावी मार्गदर्शन
1 min read

युवकांनी पुढे यावे, पर्यावरण वाचवावे — पक्षीमित्र अश्विन पाटील यांचे आवाहन , धनदाई महाविद्यालयाच्या NSS श्रमसंस्कार शिबिरात ‘पर्यावरण संवर्धन’ विषयावर प्रभावी मार्गदर्शन

Loading

युवकांनी पुढे यावे, पर्यावरण वाचवावे — पक्षीमित्र अश्विन पाटील यांचे आवाहन

धनदाई महाविद्यालयाच्या NSS श्रमसंस्कार शिबिरात ‘पर्यावरण संवर्धन’ विषयावर प्रभावी मार्गदर्शन

अमळनेर प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर आटाळे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत उत्साहात सुरू आहे.
सन २०२५–२०२६ या वर्षाची थीम “शाश्वत विकासासाठी युवक – पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमिन विकासावर विशेष भर” अशी असून त्याअंतर्गत विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि बौद्धिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याच उपक्रमांतर्गत दि. २५ जानेवारी २०२६ रोजी माध्यमिक शिक्षक तथा पक्षीमित्र श्री. अश्विन पाटील यांचे “पर्यावरण संवर्धन व जनजागृती” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
व्याख्यानात बोलताना अश्विन पाटील म्हणाले की, मानव आणि निसर्ग यांचे नाते अतूट आहे. निसर्गाशिवाय मानवाचे अस्तित्व अशक्य आहे; परंतु मानवाच्या बेफिकीर कृतींमुळेच आज निसर्ग संकटात सापडला आहे. वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, लोकसंख्या वाढ, अति उपभोग आणि बदलती जीवनशैली यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, सध्याच्या काळात हवाप्रदूषण, जलप्रदूषण, पाण्याची टंचाई, वनतोड, जैवविविधतेचा ऱ्हास, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ आणि प्लास्टिकचा अमर्याद वापर या गंभीर समस्या उभ्या ठाकल्या आहेत. “आज आपण निसर्गावर अन्याय करतोय; उद्या निसर्ग आपल्यावर कठोर होईल,” असा इशारा देत त्यांनी युवकांना पर्यावरण रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
जागरूक नागरिकच पर्यावरणाचा खरा रक्षक असतो, आणि युवकांनी जबाबदारी स्वीकारल्यास भविष्यातील पर्यावरण नक्कीच सुरक्षित राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पर्यावरण व पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. हिरालाल मोतीलाल पाटील यांनी भूषविले. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. महादेव तोंडे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. लिलाधर पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संगीता चंद्राकर, जी. टी. महाविद्यालय नंदुरबार येथील डॉ. विलास पाटील, डॉ. भगवान भालेराव, प्रा. रवींद्र चौधरी, राज माळी, कु. नंदिनी मात्रे (रा. से. यो. प्रतिनिधी) तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम युवकांमध्ये पर्यावरण जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, NSS च्या माध्यमातून समाजहिताचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *