भारतीय अर्थव्यवस्थेचे सोप्या भाषेत उलगडले रहस्य , अमळनेरमध्ये हिमांशू पवार यांचे स्पर्धा परीक्षार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन
![]()
भारतीय अर्थव्यवस्थेचे सोप्या भाषेत उलगडले रहस्य
अमळनेरमध्ये हिमांशू पवार यांचे स्पर्धा परीक्षार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे “भारतीय अर्थव्यवस्था” या विषयावरील विशेष मार्गदर्शन सत्र अमळनेर येथे उत्साहात पार पडले. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी सुरू असलेल्या मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत हे सत्र आयोजित करण्यात आले होते.
या वेळी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या हिमांशू पवार यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीच्या संकल्पना अत्यंत सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून स्पष्ट केल्या. त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न, GDP, NDP, GNP, NNP, दरडोई उत्पन्न, आर्थिक वाढ व आर्थिक विकास यांतील फरक, भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थान यांसारख्या मूलभूत संकल्पनांवर प्रकाश टाकला.
याशिवाय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (HDI), त्याची मानके व भारताचे जागतिक स्थान, वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट, महागाई, महागाईची कारणे व निर्देशक, महागाई व रोजगार यांतील परस्परसंबंध, WPI, CPI, HPI, SPI तसेच Inflation Targeting या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. राज्यसेवा, गट-ब, गट-क व इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
हिमांशू पवार यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर कला, विज्ञान व वाणिज्य शाखांतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींबाबतही मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी दिशा दिली.
या उपक्रमाचे कौतुक करताना पातोंडा परिसर विकास मंचचे संस्थापक व नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त कपिल पवार, राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी पुण्याचे संस्थापक अध्यक्ष नितीन अहिरराव, तसेच पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ व संचालक मंडळाने हिमांशू पवार यांचा सत्कार केला.
कार्यक्रमात पोलीस भरती सराव चाचणीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुलींमध्ये गीतांजली नितीन पाटील (प्रथम), रोशनी दिलीप माळी (द्वितीय), ज्योती बापू महाजन व भाग्यश्री विकास पाटील (तृतीय) तर मुलांमध्ये कल्पेश संजय पाटील (प्रथम), रुपेश सुरेश पाटील व सचिन रमेश पाटील (द्वितीय) तसेच उमेश संजय कुंभार (तृतीय) यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक गोकुळ बोरसे यांनी भूषविले. बक्षीस वितरण शिक्षक किशोर पाटील यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन प्रांजल मराठे हिने केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरत असून अमळनेर परिसरात शैक्षणिक चळवळीला नवी उभारी मिळत असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.

