देशभक्तीच्या जल्लोषात देवगाव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
![]()
देशभक्तीच्या जल्लोषात देवगाव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन देशभक्ती, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण शाळा परिसर तिरंग्याच्या रंगांनी नटला होता आणि विद्यार्थ्यांच्या देशप्रेमाने वातावरण भारावून गेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे जेष्ठ संचालक राजाराम बंडू बैसाणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रध्वज फडकताच उपस्थितांनी एकमुखाने राष्ट्रगीत सादर करत देशाप्रती अभिमान व्यक्त केला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी व उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी देशाचे सुजाण नागरिक बनावे, शिक्षणासोबत संस्कार आणि शिस्त यांनाही तितकेच महत्त्व द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुंदर व शिस्तबद्ध सूत्रसंचालन स्काऊट शिक्षक एस. के. महाजन यांनी केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी सादर केलेले झेंडा गीत व महाराष्ट्र गीत उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना जागवणारे ठरले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना साक्षर भारत व तंबाखूमुक्त भारतची शपथ देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध कवायत घेण्यात आली, ज्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व संघभावना दिसून आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आय. आर. महाजन, एच. ओ. माळी, शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील, गुरुदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
शाळेच्या विस्तीर्ण पटांगणात ग्रामपंचायत सरपंच, सर्व कार्यकारी सदस्य, माजी कार्यकारी मंडळ, जिल्हा परिषद मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ, तसेच गावातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशप्रेम, शिस्त आणि सामाजिक जाणीवा जागृत करणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, असे वातावरण या सोहळ्यात अनुभवायला मिळाले.





