श्री मंगळग्रह मंदिरात विद्याविनायक यागास मंगलमय प्रारंभ,  गणेश जयंती व वसंत पंचमीचे औचित्य साधत बुद्धिवर्धनासाठी विशेष धार्मिक आयोजन
1 min read

श्री मंगळग्रह मंदिरात विद्याविनायक यागास मंगलमय प्रारंभ, गणेश जयंती व वसंत पंचमीचे औचित्य साधत बुद्धिवर्धनासाठी विशेष धार्मिक आयोजन

Loading

श्री मंगळग्रह मंदिरात विद्याविनायक यागास मंगलमय प्रारंभ

गणेश जयंती व वसंत पंचमीचे औचित्य साधत बुद्धिवर्धनासाठी विशेष धार्मिक आयोजन

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश जयंती व वसंत पंचमीनिमित्त गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी सकाळी मंगलसुरांच्या जयघोषात श्री विद्याविनायक यागास उत्साहात प्रारंभ झाला. सायंकाळी श्री मंगळग्रह देवांच्या महाआरतीने यागाच्या पहिल्या दिवसाची भक्तिमय सांगता झाली. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसरात बुद्धीच्या देवतांचा कृपाशीर्वाद लाभत असून भक्तांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण आहे.

गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी शिरीष डहाळे सर यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करून श्री विद्याविनायक यागाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी गणपती पूजन, पंचांग कर्म, गणेशभद्र, गौरी तिलक, नवग्रह, रुद्र आदी विशिष्ट मंडलांची स्थापना करण्यात आली. गणपती व सरस्वती देवींचा महाअभिषेक करण्यात येऊन मोदक व पायस आदी द्रव्यांनी विशेष हवन झाले. बलिदान पूर्णाहुतीने विधी पूर्ण करण्यात आला.

या यागात जी. एस. हायस्कूलचे हर्षल पाटील, कृष्णागर पाटील, विराज परदेशी, लोकेश पाटील, आयुष पाटील, नील ठाकरे, स्वामी पाटील, हिमांशू वाघ व कृष्णदास बाविस्कर या नऊ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यागासाठी पुरोहित म्हणून केशव पुराणिक, सारंग पाठक, शुभम वैष्णव, प्रसाद भंडारी, यश जोशी, परशुराम शर्मा, अथर्व कुलकर्णी, चंद्रकांत जोशी, वैभव लोकाक्षी, मंदार कुलकर्णी व जयेंद्र वैद्य यांनी पौराहित्य केले.

श्री विद्याविनायक यागाचा उद्देश :
युवापिढीचे होणारे अधःपतन थांबवून त्यांना सकारात्मक ऊर्जा व सत्मार्गाची प्रेरणा मिळावी, हा या यागाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी श्री गणेश जन्मोत्सव व सरस्वती जन्मोत्सवाचे औचित्य साधून गणपती अथर्वशीर्ष स्तोत्राचे एक हजार आवर्तन करण्यात आले. तसेच श्री मंगलेश्वर गणेशजींना अभिषेक करून एक हजार मोदकांचे हवन करण्यात आले.

शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नऊ विद्यार्थिनींकडून सरस्वती देवींचे हवन होणार असून त्यानंतर आरतीने यागाची सांगता होईल. याच दिवशी जी. एस. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून गणेशस्तोत्र व प्रज्ञाविवर्धन स्तोत्रांचे सामूहिक पठण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *