“एकी, सन्मान आणि सशक्तीकरण : सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा आदर्श उपक्रम”
![]()
सर्व समाजातील नारी एकत्र करी , सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा उपक्रम भारी ! ! !
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले महिला मंडळ माळीवाडा परिसर अंमळनेर येथे स्त्रियांच्या बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, शारीरिक, सांस्कृतिक संसारिक उथ्थानासाठी आगळा आणि वेगळा आदर्श उपक्रम प्रथमच माळी मढी अंमळनेर येथे नुकताच संपन्न झाला. सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई पाटील – कवियत्री तसेच अध्यक्षा – महिला मंच अमळनेर ,प्रमुख अतिथी डॉ. अपर्णाताई मुठ्ठे, कोषाध्यक्ष सौ. कांचनताई शाह, नवनियुक्त नगरसेविका सौ. स्वप्ना विक्रांत पाटील, खानदेश शिक्षण मंडळाच्या नवनियुक्त विश्वस्त सौ. वसुंधरा ताई लांडगे, आणि तळोदा येथील महिला मंडळाच्या अध्यक्षा,उपाध्यक्षा, सचिव सर्व कार्यकारिणी, पदाधिकारी तसेच सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.विमलबाई हिम्मत महाजन यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर प्रसंगी अंमळनेर शहरातील सर्व समाजातील माता-भगिनींना आणि सर्व महिला मंडळांच्या कार्यकारिणी, पदाधिकारी सदस्यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. त्यामुळे सदरच्या कार्यक्रमास आगळी आणि वेगळी वेशभूषाधारी, नरनारी यांची भरगच्च शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागत गीत व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मातास्तवन सौ .रंजना महाजन आणि मनीषा महाजन यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अर्चना महाजन मॅडम यांनी कार्यक्रमाविषयी आणि महिलांच्या जनजागृती विषयी तसेच एकीकरणाविषयी कार्यक्रमाचे आयोजन का? आणि कशासाठी केले? याविषयी सविस्तर विचार प्रास्ताविकात मांडले.तदनंतर संपूर्ण अंमळनेर नगरीतील सर्व महिला मंडळांच्या अध्यक्षा ,सचिव, कार्यकारणी सदस्या यांचा सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.
पुरस्कारार्थी भगिनींचा मानसन्मान !!
सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या कार्यकारणीतील सदस्या 1) आशा माळी 2) रंजना महाजन 3)चित्रकला महाजन 4)कीर्ती शेलकर 5) ज्योती महाजन या भगिनींना त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन विविध संस्थांनी त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचा पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे त्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मानसन्मान करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनियुक्त नगरसेवक अनिल गंगाराम महाजन ( आबू महाजन ) यांचा नुकताच अंमळनेर नगरपरिषद अंमळनेर नगरसेवक पदी निवड झाल्यामुळे त्यांच्या पत्नी सौ .निरांजनी महाजन यांच्यासह सत्कार करण्यात आला. माता-भगिनींना ‘ संक्रांतीचा वाण, करत रहावे माता भगिनींच्या कार्याचे गुणगान , हाच आपल्या सावित्रीच्या लेकीचा बहुमान ‘! ‘ जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी ! महिलांना द्या मानसन्मान, देश घडेल आदर्श महान ! चातुर्य, बुद्धी, सुंदर मन, दयाळू हृदय , या अमूल्य गोष्टी संपूर्ण सजीव सृष्टीत फक्त आणि फक्त दोनच व्यक्तींकडे पहावयास मिळतात. एक म्हणजे जगाचे अधिराज्य चालवणारा कृपाळू दयाळू अदृश्य परमेश्वर आणि दुसरे म्हणजे जग सांभाळणारी सदृश्य महिला नरनारी ! कधी ती प्रेमाने डोक्यावर हात फिरवणारी आई असते. कधी घासातला घास काढून देणारी ताई असते. काळजी करू नको मी आहे ना ! म्हणणारी मैत्रीण असते. कधी अर्धांगिनी म्हणून साथ देणारी सुवासिनी ( धर्मपत्नी ) असते. कधी बाबा लवकर घरी या ना ! म्हणणारी बोलकी लेक असते. आणि याच लेकीला ‘ दिल्या घरी सुखी राहा ‘ ! असे म्हणणारी एका घराची सासू आणि दुसऱ्या घराची आई असते. हा आदर्श माता-भगिनींचा वसा आणि वारसा दृष्टी समोर ठेवून या आबू महाजन कुटुंबाने सावित्रीबाई फुले महिला मंडळासाठी हजारो रुपये खर्च करून सर्व उपस्थित माता-भगिनींसाठी भेटवस्तू उपलब्ध करून दिल्या आणि असेच ऋणात राहू इच्छितो या सदिच्छा व्यक्त केल्या .
तदनंतर खानदेश शिक्षण मंडळ अंमळनेरच्या त्रैवार्षिक होणाऱ्या निवडणुकीत सलग विजयाचा चौकार पटकावून विश्वस्त पदी चौथ्यांदा सलग विराजमान झालेल्या आदर्श सेवानिवृत्त शिक्षिका सौ . वसुंधरा ताई लांडगे यांनी ‘ जीवन जगण्याची कला, माता-भगिनी भारतीय नरनारी, सुरक्षित राहो अबला सारी !’ यावर सुंदर असे गीत सादर करून सर्व उपस्थितांच्या माता-भगिनींच्या मनावर वेगळाच ठसा उमटविला. आणि या सावित्रीबाई फुले महिला मंडळाने आदर्श उपक्रम राबवल्यामुळे त्यांच्या उल्लेखनीय कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली.
तसेच खास करून तळोदा जि. नंदुरबार या ठिकाणाहून आलेल्या सर्व मंडळांनीही लोकगीत, भावगीत संगीतमय आणि प्रात्यक्षिक नृत्यमय कले -कलेने सादर करून सर्वांची मने जिंकली.
प्रमुख पाहुणे कपिला मुठ्ठे यांनी रणरागिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा माता-भगिनींना जीवन कार्याचा परिचय करून दिला. सुनीता मोरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर सुंदर असे गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रजनीताई पाटील यांनी ‘ जय ज्योती जय क्रांती ! सावित्री- महात्मा ज्योतिराव फुले यांची गाऊ किती महती ! आणि स्वराज्य निर्माती राजमाता जिजाऊंनी महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या जडणघडणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कशी केली स्वराज्याची निर्मिती ! यावर सविस्तर विचार मार्गदर्शन केले.
माळी समाजाचे व्यक्तिमत्व प्राध्यापक दिनेश शेलकर आणि सौ. लता शेलकर यांनी सौ .चंद्रभागा बापूजी महाजन यांचा आदर्श सासू म्हणून गुणगौरव केला.
कार्यक्रमातील सर्वमाता-भगिनींना हसत खेळत आणि मनोरंजकतेने एक एक कार्यक्रमाची रंगत वाढवून आकर्षक असे सूत्र संचालन सौ. भारती चव्हाण मॅडम यांनी केल्यामुळे कार्यक्रमाची रंगत मनोरंजक ठरली. शेवटी कार्यक्रमात उपस्थितांचे आभार आशा माळी यांनी व्यक्त करताना ‘ आभाराचे भार कशाला ? असेच यावे महिला मंडळाच्या आदर्श उपक्रमाला आदर्श उपक्रमाला ! आम्ही ऋणात राहू इच्छितो, आपल्या एकजुटीच्या संगतीला !
कार्यक्रमाच्या अथक यशस्वीतेसाठी रंजना महाजन , सौ.भारती चव्हाण माजी अध्यक्षा सौ.मंगला चव्हाण, आशा महाजन, चित्रकला महाजन, कीर्ती शेलकर, मनीषा महाजन, अर्चना महाजन, मीना महाजन, पूर्वा महाजन , किरण महाजन, ज्योती महाजन, निरांजनी महाजन आदी सर्व महिला मंडळाच्या भगिनींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमानंतर संपूर्ण माता-भगिनी यांनी एकमेकांना ‘ संक्रांतीचा वाण तिळगुळ छान ! गोळीने एकत्र राहू आपण हीच असू द्यावी जाण ‘ म्हणून तिळगुळ घ्या, आयुष्यभर गोड गोड बोला आणिकार्यक्रमाने गोड सांगता करण्यात आली.


