“काम करा, अन्यथा खुर्ची रिकामी करा!” — नाशिकमध्ये शिक्षक आमदार किशोर दराडेंचा प्रशासनाला इशारा
![]()
“काम करा, अन्यथा खुर्ची रिकामी करा!” — नाशिकमध्ये शिक्षक आमदार किशोर दराडेंचा प्रशासनाला इशारा
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माननीय शिक्षक आमदार श्री. किशोरभाऊ दराडे यांच्या ठोस, आक्रमक व परिणामकारक नेतृत्वाखाली नाशिक येथे आयोजित विभागस्तरीय शिक्षक महा जनता दरबार अत्यंत प्रभावी ठरला. नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे समन्वयक तसेच पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक श्री. तुळशीराम सोनवणे यांनी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ज्वलंत प्रश्न अत्यंत ठामपणे मांडले. अनुकंपा तत्त्वावरील मान्यता, शालार्थ मान्यता व ड्रॉप प्रकरणे, थकीत वेतन तसेच वैद्यकीय बिलांबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाकडे त्यांनी पोटतिडकीने लक्ष वेधले.
दि. २१ जानेवारी २०२६ रोजी नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या चार जिल्ह्यांतील शिक्षक-शिक्षकेतर संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही विभागस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे, शिक्षण उपसंचालक श्री. राठोड साहेब, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शालार्थ ड्रॉप प्रकरणे, वैद्यकीय व थकीत वेतन बिले, अनुकंपा व पदमान्यता, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक मान्यता, कनिष्ठ महाविद्यालयीन थकीत वेतन, स्वयंअर्थसहाय्यित शाळांचे प्रलंबित प्रस्ताव, वाढीव तुकडी व अतिरिक्त समायोजन तसेच इयत्ता दहावी व बारावी केंद्र फेरमान्यता आदी महत्त्वाच्या शैक्षणिक प्रश्नांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या सर्व प्रश्नांवर ठाम भूमिका घेत आमदार किशोरभाऊ दराडे यांनी शिक्षण उपसंचालक श्री. राठोड यांना उद्देशून “काम करा, अन्यथा खुर्ची रिकामी करा. शिक्षकांच्या प्रश्नांवर आता कोणतीही तडजोड चालणार नाही,” असा स्पष्ट व कडक इशारा दिला. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने दोन महिन्यांच्या आत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले.
या प्रभावी हस्तक्षेपामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधान आणि नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षकांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघटनांची एकजूट अधिक बळकट झाल्याचा ठाम संदेश या महा जनता दरबारातून मिळाल्याचे स्पष्ट झाले.

