कर्तव्य बजावताना काळाचा घाला; महावितरणचे वायरमन शरद गोसावी यांचा दुर्दैवी मृत्यू , काही दिवसांपूर्वी भर पावसात जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतानाच अंत; अमळनेरमध्ये हळहळ
1 min read

कर्तव्य बजावताना काळाचा घाला; महावितरणचे वायरमन शरद गोसावी यांचा दुर्दैवी मृत्यू , काही दिवसांपूर्वी भर पावसात जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतानाच अंत; अमळनेरमध्ये हळहळ

Loading

कर्तव्य बजावताना काळाचा घाला; महावितरणचे वायरमन शरद गोसावी यांचा दुर्दैवी मृत्यू

काही दिवसांपूर्वी भर पावसात जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतानाच अंत; अमळनेरमध्ये हळहळ

अमळनेर, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसात जीवाची पर्वा न करता आर. के. नगर परिसरातील तिरपा झालेला वीजवाहिनीचा खांब आणि रोहित्र दुरुस्त करून शेकडो नागरिकांच्या घरातील अंधार दूर करणारे महावितरणचे कर्तव्यदक्ष कर्मचारी शरद गोसावी यांचे मंगळवारी कर्तव्य बजावत असतानाच दुर्दैवी निधन झाले. जनतेच्या सेवेसाठी सतत तत्पर असलेल्या एका कर्मयोग्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील भगवा चौक परिसरात शरद गोसावी आणि त्यांच्या अन्य चार सहकाऱ्यांकडून वीज दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक घडलेल्या दुर्घटनेत शरद गोसावी हे विजेच्या खांबावर काही मिनिटे लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ते सुमारे पाच ते दहा मिनिटे खांबावरच अडकून होते. त्यानंतर ते अचानक खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नेमकी दुर्घटना कशामुळे घडली, याबाबत अधिकृत चौकशीनंतरच स्पष्टता येणार असल्याचे सांगितले जात आहे.
शरद गोसावी हे महावितरणमधील कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. काही दिवसांपूर्वीच मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि जीवाला धोका असतानाही त्यांनी आर. के. नगर परिसरातील तिरपा झालेला वीज खांब आणि रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला होता. नागरिकांच्या घरात पुन्हा उजेड पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. नियतीने मात्र त्यांच्यावरच काळाचा घाला घातला.
महावितरणचे कर्मचारी पाऊस, वादळ, मध्यरात्र किंवा उन्हाळ्याची तीव्रता अशा कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत असतात. शरद गोसावी यांचे निधन ही केवळ एका कर्मचाऱ्याची हानी नसून समाजासाठी निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या एका कर्तव्यदक्ष योद्ध्याची अपूरणीय हानी असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

चौकट :

‘उजेड देणारा दीप’ कायमचा मालवला

वीजेच्या पोलवर काम सुरू असतानाच काळाचा घाला; परिसरात हळहळ

अमळनेर शहरातील प्रभाग क्र. १६ मधील डी.डी. नगर येथील रहिवासी व महावितरणचे कर्तव्यदक्ष वायरमन शरद गोसावी यांचे सेवेत असतानाच झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने महावितरणसह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेबाबत युवा सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ पितांबर पाटील यांनी दुःख व्यक्त करत सांगितले, “परवाच दिवसभर आम्ही सुरभी कॉलनी आणि अशोकरत्न नगर येथे नवीन वीज खांब उभारणीच्या कामात एकत्र होतो. शरदभाऊ नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत होते. कर्तव्य बजावत असतानाच त्यांना मृत्यूने गाठले, ही अत्यंत वेदनादायी घटना आहे.”

🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹

सौ. नीलिमा रवींद्र पाटील – नगरसेविका प्रभाग १६
रविभाऊ पितांबर पाटील – युवा सामाजिक कार्यकर्ते, प्रभाग क्र. १६
महेश देशमुख – नगरसेवक प्रभाग १६

(मराठी लाईव्ह न्युज, प्नखर जनसंवाद च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली💐💐)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *