वाळू मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी; अनेक जखमी — 108 रुग्णवाहिकेच्या विलंबावर संताप
1 min read

वाळू मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी; अनेक जखमी — 108 रुग्णवाहिकेच्या विलंबावर संताप

Loading

🚨 वाळू मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी; अनेक जखमी — 108 रुग्णवाहिकेच्या विलंबावर संताप

मुंगसे ता. अमळनेर | दि. १९ (वार्ताहर) :
मुंगसे–सावखेडा रस्त्यावर वाळू ठेक्यावरील मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर आज सकाळी सुमारे ८.३० वाजता पलटी झाले. या भीषण अपघातात अनेक मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील डॉ. राजेश पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर तातडीच्या मदतीसाठी बोलावण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका अमळनेर येथून तब्बल चार तासांनी घटनास्थळी दाखल झाली. तसेच कासोदा (ता. एरंडोल) येथील १०८ रुग्णवाहिकाही दुपारी १२ वाजता पोहोचली. तोपर्यंत ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना खासगी वाहनांद्वारे धुळे येथे रवाना करण्यात आले होते. या विलंबामुळे नागरिकांमध्ये १०८ आपत्कालीन सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये मजूर क्षमतपेक्षा अधिक प्रमाणात भरलेले असल्याने वाहन असंतुलित होऊन पलटी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे मुंगसे येथील वाळू ठेका सुरू असल्याने वाळूने भरलेले डंपर व ट्रॅक्टर भरधाव वेगाने या मार्गावरून वाहतूक करत आहेत. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच पायी चालणाऱ्या ग्रामस्थांना मोठा जीवित धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर संतप्त मुंगसे ग्रामस्थांनी एकत्र येत, “या रस्त्यावरून वाळूची अवजड वाहतूक चालू देणार नाही. सर्व वाहने नदीकडील पुलावरूनच वळवावीत,” अशी ठाम मागणी केली आहे. अपघातस्थळी ग्रामस्थांनी तात्काळ सहकार्य करत यापुढे या रस्त्यावरून वाळू वाहतूक न करण्याचा एकमुखी इशारा दिला.

या घटनेनंतर महसूल विभागाच्या दुर्लक्षावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *