पर्यावरण संवर्धनाचा दीप उजळणारे पक्षीमित्र अश्विन पाटील सन्मानित
1 min read

पर्यावरण संवर्धनाचा दीप उजळणारे पक्षीमित्र अश्विन पाटील सन्मानित

Loading

पर्यावरण संवर्धनाचा दीप उजळणारे पक्षीमित्र अश्विन पाटील सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी :
पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे पक्षीमित्र अश्विन पाटील यांना पर्यावरण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. उपक्रमशील शिक्षक म्हणूनही परिचित असलेल्या पाटील यांनी आजवर अनेक पक्ष्यांना जीवदान देत पर्यावरणप्रेमी म्हणून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून ती बाब विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी, या उद्देशाने ते विविध शाळांमध्ये व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती करीत असतात. पर्यावरणाच्या माध्यमातून यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून त्यांच्या या कार्याची दखल घेत नुकताच त्यांना ‘स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार (पर्यावरण संवर्धन–संरक्षण)’ देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर यांच्या १०व्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना “दीपम भव” अशी प्रेरणादायी ठेवण्यात आली होती. पुरस्कारप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन अश्विन पाटील यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. उमेश शर्मा (सीईओ, शिरपूर एज्युकेशन सोसायटी व एसव्हीकेएम स्कूल्स, शिरपूर) हे होते. तर सन्माननीय अतिथी म्हणून श्री. कपिल जयकर पवार (उपायुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक), श्री. बजरंग अग्रवाल (मार्गदर्शक), प्रा. डी. डी. पाटील (चेअरमन), निरज अग्रवाल (C.A.) (संस्थापक अध्यक्ष), श्रीमती सितेका अग्रवाल (अध्यक्षा), प्राचार्य श्री. विनोद अमृतकर, श्रीमती वसुंधरा लांडगे (खान्देशी शिक्षण मंडळाच्या विश्वस्त) तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर उपस्थित होते.
अश्विन पाटील यांच्या या सन्मानाबद्दल त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व मित्रपरिवाराने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. पर्यावरण रक्षणाचा दीप सतत उजळवत समाजाला दिशा देणाऱ्या त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *