सातपुड्यातील अनेर नदीकाठी निसर्गमित्रांची रंगतदार पक्षी निरीक्षण भटकंती
![]()
सातपुड्यातील अनेर नदीकाठी निसर्गमित्रांची रंगतदार पक्षी निरीक्षण भटकंती
अमळनेर प्रतिनिधी
निसर्गाच्या सान्निध्यात जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी निसर्ग मित्र मंडळ, अमळनेर यांच्या वतीने सातपुड्यातील शटलवर्थ घाटातून उगम पावणाऱ्या अनेर नदी परिसरात स्थलांतरित पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी विशेष भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गप्रेमींसाठी ही भटकंती एक अविस्मरणीय अनुभूती ठरली.
हिवाळ्याच्या सुरुवातीलाच सुमारे तीन हजार किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास करून हजारो पक्षी खानदेशातील दर्याखोऱ्यांमध्ये व नद्यांच्या काठावर वास्तव्यास येतात. या भटकंतीदरम्यान रशियन बदके, उंच पायांचे स्टिल्ट, अवाक, तुतवार, शिक्रा, कस्तूर, क्रेन, वेडा राघू, सातभाई आदी विविध प्रजातींचे दर्शन झाले.
फेब्रुवारी महिन्यात हिवाळा संपता संपता हे पक्षी पुन्हा आपल्या मूळ प्रदेशाकडे परतीचा प्रवास सुरू करतात. अन्नाची मुबलक उपलब्धता व उबदार हवामान यामुळे हे पक्षी खानदेशात चार महिन्यांपर्यंत वास्तव्यास राहतात, पिल्लांना जन्म देतात आणि नंतर परत जातात. हे नैसर्गिक स्थलांतराचे चक्र वर्षानुवर्षे अखंडपणे सुरू आहे, याचे दर्शन या भटकंतीतून घडले.
देवझिरीच्या जंगल परिसरात आजही साग, सलई, बांबू, धावडा, सादडा, मोह, हिरडा, अंजन यांसारखी वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणावर आढळते. पानझड सुरू झाल्याचे दृश्य दिसत होते. मोह, सादडा व हळदूच्या फुलोऱ्याने जंगल अधिकच मनमोहक झाले होते. याच काळात डिंक संकलनाचे कामही सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
शेकाटया …
या निसर्गभ्रमंतीत दिलीप सोनवणे, शितल देशमुख, चंद्रकांत भदाणे, प्रा. भराटे, उमेश वाल्हे, निलेश लांडगे, रवि पाटील, प्रा. प्रकाश धर्माधिकारी आदी निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
निसर्ग संवर्धन, पक्षी संरक्षण आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने ही पक्षी निरीक्षण भटकंती प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरली, असे मत सहभागी सदस्यांनी व्यक्त केले.



