राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त अमळनेर तालुकास्तरीय भव्य निबंध स्पर्धा  ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; २४ जानेवारीला पारितोषिक वितरण सोहळा
1 min read

राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त अमळनेर तालुकास्तरीय भव्य निबंध स्पर्धा ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; २४ जानेवारीला पारितोषिक वितरण सोहळा

Loading

राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त अमळनेर तालुकास्तरीय भव्य निबंध स्पर्धा

३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; २४ जानेवारीला पारितोषिक वितरण सोहळा

अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन)
अमळनेर तहसील हिंदी अध्यापक मंडळ, अमळनेर आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने १४ सप्टेंबर राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त तालुकास्तरीय राष्ट्रभाषा हिंदी निबंध स्पर्धा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. अमळनेर हिंदी अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जात असून, विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला वाव देण्याचे कार्य मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहे.
यंदाच्या निबंध स्पर्धेला अमळनेर तालुक्यातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद मिळाला. तब्बल ३०३४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून राष्ट्रभाषेबद्दलची आपली आवड आणि लेखनकौशल्य सादर केले.
या स्पर्धेतून ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक गटांतील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण विभागातून प्राथमिक व माध्यमिक गटातील पहिल्या सात, तर शहरी विभागातून प्राथमिक व माध्यमिक गटातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उर्वरित सर्व सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या शाळांमध्ये विशेष कार्यक्रमात सहभाग प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे केवळ अमळनेर तालुक्यातीलच नव्हे, तर एरंडोल व पारोळा तालुक्यातील विशेष शाळांनीही या निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. या माध्यमातून अमळनेर, एरंडोल व पारोळा तालुक्यातील ३९ कृतिशील हिंदी अध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. लहान गटातून १९, तर मोठ्या गटातून २३ पारितोषिके विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार आहेत.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता, पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढी, अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व ज्येष्ठ विचारवंत संदीप घोरपडे असतील. प्रमुख अतिथी म्हणून युनियन बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील, हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील (जळगाव) तसेच खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा ताई लांडगे उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, यावर्षी पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय, फाफोरे येथील सेवानिवृत्त हिंदी शिक्षक संभाजी निंबा पाटील यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
ही माहिती हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र श्रीराम पाटील, उपाध्यक्ष श्रीमती योगश्री मधुकर पाटील, सचिव दिलीप बळीराम पाटील, व इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
या निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शाळांतील गुणवंत विद्यार्थी व हिंदी शिक्षकांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *