स्पर्धा परीक्षेत यशासाठी सकारात्मक ज्ञानाचा उपयोग आवश्यक —डॉ जयदीप पाटील  अमळनेरात पोलीस भरती टेस्ट सिरीजला उत्स्फूर्त प्रतिसाद, यशस्वी उमेदवार व टीईटी उत्तीर्णांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
1 min read

स्पर्धा परीक्षेत यशासाठी सकारात्मक ज्ञानाचा उपयोग आवश्यक —डॉ जयदीप पाटील अमळनेरात पोलीस भरती टेस्ट सिरीजला उत्स्फूर्त प्रतिसाद, यशस्वी उमेदवार व टीईटी उत्तीर्णांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

Loading

स्पर्धा परीक्षेत यशासाठी सकारात्मक ज्ञानाचा उपयोग आवश्यक —डॉ जयदीप पाटील

अमळनेरात पोलीस भरती टेस्ट सिरीजला उत्स्फूर्त प्रतिसाद,
यशस्वी उमेदवार व टीईटी उत्तीर्णांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर येथे पोलीस भरती टेस्ट सिरीजमध्ये यश संपादन केलेल्या उमेदवारांचा तसेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण शिक्षक बंधू–भगिनींचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
ही पोलीस भरती टेस्ट सिरीज पुढचे साने गुरुजी ग्रंथालय संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अमळनेर, पातोंडा परिसर विकास मंच व राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून, सध्या या टेस्ट सिरीजचा २०० पेक्षा अधिक विद्यार्थी लाभ घेत आहेत. अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट सिरीज अत्यंत उपयुक्त ठरत असून, तालुकाभरातून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार सर यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. शाळेतील नोकरी सांभाळत दर रविवारी विद्यार्थ्यांसाठी वेळ देणे, सातत्याने मार्गदर्शन करणे आणि त्या मेहनतीतून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत संधी मिळवून देणे, ही नक्कीच साधी बाब नाही, असे यावेळी नमूद करण्यात आले. आज हे छोटेखानी स्पर्धा परीक्षा केंद्र एका वटवृक्षात रूपांतरित झाले असून, यामागे पवार सरांची निष्ठा, चिकाटी आणि सेवाभाव आहे. यासाठी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी दिलेल्या सहकार्याचाही विशेष उल्लेख करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नोबेल फाउंडेशन, जळगावचे अध्यक्ष श्री जयदीप पाटील यांनी प्रेरणादायी विचार मांडले. ते म्हणाले, “आपल्याजवळ असलेल्या प्रचंड ज्ञानाचा योग्य व सकारात्मक उपयोग झाला पाहिजे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण केवळ दोन टक्केच ज्ञान आत्मसात करतो. पृथ्वीवर अफाट ज्ञान आहे—ते घेण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. त्यामुळे मोठी स्वप्ने पाहा आणि ती साकार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.”
ते पुढे म्हणाले, “खोट्या प्रतिमांमध्ये अडकू नका, स्वतःला ओळखा. अहंकार (ईगो) हा यशाच्या आड येतो. साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राचा पुरेपूर उपयोग करा.”
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री रामचंद्र पाटील यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य दिशा, सातत्य आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा चळवळ ही एक व्यापक सामाजिक चळवळ असून, ती अधिक बळकट झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेले श्री प्रवीण पाटील, श्री किशोर पाटील व श्रीमती जयश्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस भरती टेस्ट सिरीजमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यशस्वी उमेदवारांच्या सत्कारामुळे संपूर्ण वातावरण प्रेरणादायी व उत्साहवर्धक झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना पत्रकार श्री ईश्वर महाजन म्हणाले की, “स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात सातत्य हेच यशाचे खरे गमक आहे. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावरच यश संपादन करता येते. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःपुरते न थांबता आपल्या आई–वडिलांचे, मार्गदर्शकांचे व स्पर्धा परीक्षा केंद्राचे नाव उज्वल करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री जयदीप पाटील, श्री रामचंद्र पाटील व श्री दिनेश निघोट सर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *