क्रीडा संकुल अमळनेर येथे सॉफ्टबॉलचा जल्लोष ; मारवड व प्रताप महाविद्यालयांचा विजय अमळनेर येथे एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धांचा उत्साहात समारोप
![]()
क्रीडा संकुल अमळनेर येथे सॉफ्टबॉलचा जल्लोष ; मारवड व प्रताप महाविद्यालयांचा विजय
अमळनेर येथे एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धांचा उत्साहात समारोप
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा शुक्रवार, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी क्रीडा संकुल, अमळनेर येथे मोठ्या उत्साहात व खेळाडूवृत्तीच्या वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांचे आयोजन कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्यावतीने करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये एरंडोल विभागातील विविध महाविद्यालयांचे सहा पुरुष संघ व तीन महिला संघांनी सहभाग नोंदवला. अत्यंत चुरशीचे व थरारक सामने प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरले. उत्कृष्ट संघभावना, कौशल्यपूर्ण खेळ व शिस्तबद्ध आयोजनामुळे स्पर्धांचा दर्जा उंचावला.
महिला गटात प्रताप महाविद्यालय व बी.पी.आर. महाविद्यालय, चाळीसगाव यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात दमदार खेळ करत प्रताप महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले.
पुरुष गटात कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड व धनदाई महाविद्यालय, अमळनेर यांच्यात अंतिम सामना रंगला. उत्कंठावर्धक लढतीत मारवड महाविद्यालयाने अंतिम विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या स्पर्धांच्या अध्यक्षस्थानी मा. आबासो जयवंतराव मन्साराम पाटील (अध्यक्ष, ग्रामविकास शिक्षण मंडळ) होते. उद्घाटन मा. श्याम जयवंत पाटील (अध्यक्ष, राजमुद्रा फाउंडेशन, अमळनेर) यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून आबासो देविदास शामराव पाटील (उपाध्यक्ष), बापूसो शांताराम शामराव पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य), डॉ. सुरेश मन्साराम पाटील (संचालक), नानासो के. व्ही. पाटील (प्रशासकीय अधिकारी), महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. वसंत देसले, अमळनेर तालुका क्रीडा समन्वयक श्री. सुनील वाघ, प्रताप महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील, एस.एस.बी.टी. बांभुरी कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा. मुकुंद शिरसाठ, एरंडोल विभागाचे सचिव डॉ. शैलेश पाटील उपस्थित होते.
स्पर्धांसाठी पंच म्हणून जयेश मासरे व चंद्रकांत अहिरे यांनी जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. देवदत्त पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सचिन पाटील यांनी मानले.
या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक उत्साह वाढीस लागला असून, शिस्त, संघभावना व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे दिला गेला.

