‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमातून साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये जिवंत शिक्षणाचा अनुभव
![]()
‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमातून साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये जिवंत शिक्षणाचा अनुभव
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये ‘पाड्यावरचा चहा’ या अभिनव उपक्रमातून विद्यार्थिनींना केवळ पाठ्यपुस्तकापुरते नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. मराठी विषयाचे उपक्रमशील शिक्षक श्री. मकेश अमृत पाटील सर यांच्या कल्पक संकल्पनेतून व मुख्याध्यापिका सौ. अनिता बोरसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
इयत्ता आठवीच्या मराठी अभ्यासक्रमातील ‘पाड्यावरचा चहा’ या पाठाचा कृतीयुक्त अनुभव घेण्यासाठी शाळेच्या मैदानात झाडांच्या सावलीत विद्यार्थिनींनी साडी व ओढणींच्या सहाय्याने झोपड्यांची उभारणी केली. दगड व विटा वापरून चुली तयार करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थिनींनी भाकरी, भरीत, विविध भाज्या, भज्या, उडदाचे वडे, पराठे, ठेचा आदी पारंपरिक पदार्थ स्वतः तयार केले. पातेल्याला बुण लावण्यापासून ते चहा तयार होईपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया त्यांनी उत्साहाने अनुभवली.
या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब श्री. हेमकांतजी पाटील, सचिव दादासाहेब श्री. संदिपजी घोरपडे, अॅड. कौतुभ पाटील तसेच सर्व संचालक मंडळाने उपस्थित राहून विद्यार्थिनींचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थिनींच्या पाककौशल्याचा आनंद घेत शाबासकी दिली.
कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक जे. एस. पाटील सर, दिलीप पाटील सर, वैद्य मॅडम, महाजन सर, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनीही उपस्थिती लावून या आनंददायी वातावरणाचा मनसोक्त आस्वाद घेतला.
या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक अनुभवात नवा आयाम जोडला गेला. आनंददायी वातावरणात मूल्यसंवर्धन, सहकार्य, श्रमप्रतिष्ठा व ग्रामीण जीवनाची ओळख करून देणारा ‘पाड्यावरचा चहा’ हा उपक्रम साने गुरुजी कन्या हायस्कूलसाठी अविस्मरणीय ठरला.

