साई इंग्लिश अकॅडमीतर्फे १८ जानेवारी रोजी ‘पुस्तक व लेखक ओळख स्पर्धा’ विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी भैय्यासाहेब मगर यांचा अभिनव उपक्रम
![]()
साई इंग्लिश अकॅडमीतर्फे १८ जानेवारी रोजी ‘पुस्तक व लेखक ओळख स्पर्धा’
विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी भैय्यासाहेब मगर यांचा अभिनव उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, तसेच पुस्तकांशी नाते अधिक दृढ व्हावे या उद्देशाने अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमीतर्फे रविवार, दिनांक १८ जानेवारी रोजी पुस्तक व लेखक ओळख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाने अमळनेर शहराला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित केले असून, या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याच्या उद्देशाने साई इंग्लिश अकॅडमीचे संचालक भैय्यासाहेब मगर यांनी हा नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे.
या स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवडक व दर्जेदार ५० पुस्तकांची व त्यांच्या लेखकांची ओळख करून देण्यात येणार आहे. स्पर्धेपूर्वीच विद्यार्थ्यांना संबंधित पुस्तकांची व लेखकांची सविस्तर यादी उपलब्ध करून दिली जाणार असून, त्याच आधारे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता आयुष्यभर उपयोगी पडेल असे वाचनविषयक ज्ञान मिळणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध साहित्यप्रकार, थोर लेखक व त्यांच्या साहित्याची ओळख होणार असून, भविष्यात हीच पुस्तके वाचण्याची सवय लागेल, असा विश्वास आयोजक भैय्यासाहेब मगर यांनी व्यक्त केला आहे.
वाचनसंस्कृती जपण्यासाठी व ती अधिक बळकट करण्यासाठी साई इंग्लिश अकॅडमीतर्फे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे शैक्षणिक व सामाजिक स्तरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

