समर्पण, सेवा आणि राष्ट्रभक्तीचा जागर — अमळनेर येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त “समर्पण दिन” उत्साहात साजरा
![]()
समर्पण, सेवा आणि राष्ट्रभक्तीचा जागर — अमळनेर येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त “समर्पण दिन” उत्साहात साजरा
अमळनेर | प्रतिनिधी
समर्पित समाजसेवा, धगधगती राष्ट्रभक्ती आणि त्यागमय जीवनमूल्यांचे प्रतीक असलेले स्वराज्य जननी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि युवाशक्तीचे प्रेरणास्थान श्री स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक व प्रेरक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सतिश देशमुख यांनी केले.
दिनांक १२ जानेवारी रोजी श्री स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर यांच्या वतीने “समर्पण दिन” मोठ्या उत्साहात व सेवाभावी भावनेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. ताईसाहेब स्मिता चंद्रात्रे होत्या. प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. सतिश देशमुख (जिल्हा उपाध्यक्ष) तसेच श्री. भाऊसाहेब देशमुख यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युगपुरुष श्री स्वामी विवेकानंद, स्वराज्य प्रेरक राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक अध्यक्ष स्व. बिंदुमाधव जोशी (नाना) यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
ग्राहक संघटन मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात ॲड. ताईसाहेब भारती अग्रवाल यांनी केली. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमाचे सुबोध प्रास्ताविक सादर केले.
मार्गदर्शन करताना श्री. सतिश देशमुख यांनी स्वामी विवेकानंदांच्या राष्ट्रोद्धारक विचारांची व राजमाता जिजाऊंच्या संस्कारक्षम मातृत्वाची सखोल उकल करत, आजच्या समाजाला मूल्याधिष्ठित वाटचालीसाठी हे विचार किती आवश्यक आहेत, यावर विविध उदाहरणांसह प्रभावी भाष्य केले.
राष्ट्रीय युवा दिन व समर्पण दिनाचे आद्य प्रवर्तक मानल्या जाणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्यावर श्री. भाऊसाहेब देशमुख यांनी प्रेरणादायी मुक्त विवेचन केले.
कार्यक्रमात समाजसेवेचा जिवंत आदर्शही पाहायला मिळाला. जिल्हा सहसचिव श्री. भाऊसाहेब मकसूद बोहरी (अमळनेर), सौ. ताईसाहेब मेहराज भाभी व त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतः शिवलेली २५ दोड ब्लँकेट्स समर्पण दिनाचे औचित्य साधत पुणे येथील डॉ. अपर्णा देशमुख यांच्या ‘आभाळमाया वृद्धाश्रम’ मधील निराधार व गरजू वृद्धांसाठी देण्यात आली. गेली पंधरा वर्षे वृद्धसेवेत अग्रेसर असलेल्या या संस्थेसाठी ही मदत मायेची उब देणारी ठरली. ही ब्लँकेट्स लवकरच वृद्धाश्रमात पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ही सेवा सामग्री मध्य महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी प्रतिनिधी सदस्या ॲड. भारती अग्रवाल, ऊर्जा मित्र श्री. सुनील वाघ आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. सुभाष पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
कार्यक्रमास आदर्श शिक्षक श्री. सतिश देशमुख, निवृत्त प्रशासन अधिकारी श्री. भाऊसाहेब देशमुख, सायबर बँक क्राइम जागृती मार्गदर्शक श्री. विजय शुक्ला, ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी सनदी अधिकारी श्री. काकासाहेब उपासनी, महिला संघटक सौ. मेहराज भाभी, तालुका उपाध्यक्षा सौ. ज्योती भावसार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड. ताईसाहेब भारती अग्रवाल यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्षा सौ. ताईसाहेब ज्योती भावसार यांनी भावपूर्ण शब्दांत केले. शेवटी शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
समर्पण, सेवा आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम ठरलेला हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात राष्ट्रभक्तीची नवी ज्योत प्रज्वलित करून गेला.

