कै. सौ. वत्साई यांच्या १०व्या पुण्यस्मरणानिमित्त दहिवद येथे भव्य कीर्तन व “वत्साई अग्निपुष्प” पुरस्कार वितरण सोहळा
![]()
कै. सौ. वत्साई यांच्या १०व्या पुण्यस्मरणानिमित्त दहिवद येथे भव्य कीर्तन व “वत्साई अग्निपुष्प” पुरस्कार वितरण सोहळा
अमळनेर प्रतिनिधी
श्री वासुदेव देसले यांच्या मातोश्री कै. सौ. वत्साई यांच्या १०व्या पुण्यस्मरणानिमित्त दहिवद येथे भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरणात भव्य कीर्तन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ह.भ.प. सौ. कांचनताई जगताप (अध्यक्ष – निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर) यांचे सुमधुर व विचारप्रवर्तक कीर्तन संपन्न झाले.
कीर्तनप्रसंगी कै. सौ. वत्साई यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आयुष्यभर केलेल्या खडतर परिश्रम, त्याग, कुटुंबासाठी झटलेले संघर्षमय जीवन आणि त्यांनी दिलेले संस्कार यांचे भावपूर्ण स्मरण करण्यात आले. त्यांच्या जीवनकार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून, प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत आपल्या पाल्यांना सुसंस्कृत व उच्चशिक्षित घडविणाऱ्या १५ कर्तृत्ववान महिलांचा “वत्साई अग्निपुष्प” पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सौ. सुषमाताई देसले-पाटील (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर) व ह.भ.प. सौ. कांचनताई जगताप यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारस्वरूप पुष्पहार, सन्मानचिन्ह, साडी व शाल देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमातील एक भावस्पर्शी क्षण म्हणजे, कीर्तनासाठी उपस्थित असलेल्या शेकडो महिलांना थंडीपासून संरक्षण मिळावे या हेतूने सौ. सुषमाताई देसले-पाटील यांनी स्वतः प्रत्येक महिलेकडे जाऊन उबदार शाली परिधान केल्या. त्यांच्या या संवेदनशील सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक झाले.
या प्रसंगी असंख्य भाविक भक्त, गावकरी, महिला भगिनी व मान्यवर उपस्थित होते. भक्ती, कृतज्ञता आणि सामाजिक जाणीव यांचा संगम असलेला हा पुण्यस्मरण सोहळा उपस्थितांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेला.






