रंबल स्ट्रिप निष्फळ; मंगलमुर्ती चौकात अपघातांची मालिका, शेतकरी जखमी*
1 min read

रंबल स्ट्रिप निष्फळ; मंगलमुर्ती चौकात अपघातांची मालिका, शेतकरी जखमी*

Loading

*रंबल स्ट्रिप निष्फळ; मंगलमुर्ती चौकात अपघातांची मालिका, शेतकरी जखमी*

*अमळनेर | प्रतिनिधी*

अमळनेर शहरातील स्टेशन रोडवरील मंगलमुर्ती चौक ते गलवाडे रोड मार्गे शिरपूरकडे जाणारा प्रमुख रस्ता पुन्हा एकदा अपघातामुळे चर्चेत आला आहे. या ठिकाणी दररोज होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत असून, आज झालेल्या अपघातात एक दुधवाला शेतकरी जखमी झाला आहे.

संबंधित शेतकरी दुचाकीने जात असताना अचानक वाहनाला धडक बसून गाडी स्लीप झाल्याची घटना घडली. त्याच्याजवळ असलेले सर्व दूध रस्त्यावर पडले सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी शेतकरी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

मंगलमुर्ती चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून या मार्गावरून सकाळ-संध्याकाळ वाहतूक करणारे प्रवासी, शाळकरी मुले, प्रताप महाविद्यालयीन विद्यार्थी, पादचारी व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र वाहनचालकांकडून वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार दररोज दिवसा एक ते पाच अपघात या परिसरात होत आहेत.

काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपघात रोखण्यासाठी रस्त्यावर रंबल स्ट्रिप टाकण्यात आल्या होत्या. मात्र त्या अपुऱ्या ठरत असून अपघात कमी करण्यात त्या निष्फळ ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत नाराजी वाढत आहे.

याच ठिकाणी अल्पवयीन मुले दुचाकी चालवणे, स्टंटबाजी करणे, तसेच मोठ्या वाहनांकडून होणारा ओव्हरस्पीड हेही अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा रस्ता प्रताप कॉलेज व शाळांकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. विशेषतः ई-बाईक्सच्या वाढत्या वापरामुळे अल्पवयीन मुलांचे अपघात वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी मंगलमुर्ती चौक व परिसरातील स्पीड ब्रेकर मोठे करणे, नवीन व प्रभावी स्पीड ब्रेकर बसवणे, वेगमर्यादा फलक लावणे आणि ओव्हरस्पीड वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या तत्काळ व ठोस कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *