निवडणुकीच्या धुरात हरवली श्वासांची लढाई! हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोक्याच्या पातळीवर* – डी. ए. धनगर
1 min read

निवडणुकीच्या धुरात हरवली श्वासांची लढाई! हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोक्याच्या पातळीवर* – डी. ए. धनगर

Loading

*निवडणुकीच्या धुरात हरवली श्वासांची लढाई! हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोक्याच्या पातळीवर* – डी. ए. धनगर

राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, नागरिकांचा श्वास मात्र दिवसेंदिवस कोंडत चालला आहे. प्रचार, सभा, घोषणा यांचा गोंधळ असताना शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) थेट 150 च्या आसपास पोहोचला आहे. मात्र या गंभीर विषयाकडे सत्ताधारी आणि प्रशासनाचे जणू दुर्लक्षच झाले आहे, अशी चिंता पर्यावरण अभ्यासक डी. ए. धनगर यांनी व्यक्त केली आहे.

शहरातील रस्त्यांवर साचलेली धूळ, खुलेआम सुरू असलेली बांधकामे आणि अपुरी स्वच्छता व्यवस्था यामुळे हवेतील प्रदूषणात मोठी भर पडत आहे. वातावरणात उडणारी धूळ हीच सध्या प्रदूषणाची मुख्य कारणीभूत घटक ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड, ओझोन, सल्फर डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड यांसारखे घटक सध्या नियंत्रणात आहेत. मात्र धुळीकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

या वाढत्या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. खोकला, श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, घसा खवखवणे, छातीत दुखणे, उलटी, सांधेदुखी अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. विशेषतः हृदयविकार, दमा यांसारख्या जुनाट आजारांनी ग्रस्त रुग्ण, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा अधिक फटका बसत आहे.

त्यातच दिवसागणिक बदलणारे हवामान, कधी थंडी तर कधी उष्णता, यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येत आहे. अशा परिस्थितीत प्रदूषणाची भर पडल्याने अनेक कुटुंबे चिंतेत सापडली आहेत.

“फक्त शहर व रस्त्यांवरील धूळ नियंत्रणात आणली तरी प्रदूषण बऱ्याच अंशी आटोक्यात येऊ शकते,” असे मत धनगर यांनी व्यक्त केले आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून रस्त्यांवरील धूळ नियंत्रणात आणावी, बांधकामांवर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी जाणकारांकडून होत आहे.

निवडणुकीचा गदारोळ संपेल…
पण वेळेत पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा श्वास मात्र कायमचा अडखळू शकतो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *