कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथील शिवकन्यांनी केला राजमाता जिजाऊंचा जागर!
![]()
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथील शिवकन्यांनी केला राजमाता जिजाऊंचा जागर!
धुळे प्रतिनिधी :
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी स्वराज्य जननी, प्रेरणेचा अखंड स्त्रोत राजमाता जिजाऊ व हिंदू संस्कृतीचे रक्षक, महान तत्वज्ञानी व तरुणांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या गुणदर्शनाने नटलेला भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. यांनी जबाबदारी सांभाळली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी व संस्थेचे सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन हे उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. अण्णासाहेब माळी बी. एन., विज्ञान शिक्षक श्री. माळी के. एन., कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, लिपिक श्री. चेतन माळी, शिपाई श्री. पंडित खैरनार व श्री. सुनील ठाकरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या भूमिका साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मराठमोळ्या तालवाद्यांच्या गजरात व तुतारी निनादात शानदार प्रवेशाने झाली.
यावेळी “जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र” या घोषणांनी संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला. हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
यानंतर राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थीनींनी बहारदार स्वागत गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनींनी सुंदर वेशभूषा, नाट्यकृती, भाषणे, गीतगायन व समूह नृत्य यांचे एकापेक्षा एक सरस सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी कु. चंचल मनिष वसावे हिने राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत “मी जिजाऊ बोलते” हे साभिनय नाट्यस्वगत सादर करून उपस्थितांना भावूक केले.
इयत्ता ९ वी चा विद्यार्थी सिद्धेश मनोज शेवाळे याने छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब प्रतिमा व बाणेदार स्वरातील स्वगत साकारले.
तर इयत्ता ५ वी चा चिमुकला विद्यार्थी राज राजू बिर्हाडे याने स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेत उत्कृष्ट वेशभूषा व साभिनय सादरीकरण करून सर्वांचे विशेष कौतुक मिळवले.
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थिनींनी पारंपरिक मराठमोळ्या थाटात नऊवारी साडी परिधान करून कृतीयुक्त सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रत्येक सादरीकरणानंतर मान्यवरांनी रोख बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशालेय व सांस्कृतिक समिती प्रमुख कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लिपिक श्री. चेतन माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून तोंड गोड करण्यात आले.

