राजमाता जिजाऊ–स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त धरणगावात महा-आरोग्य पर्व , श्री चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालयाच्या मोफत तपासणी शिबिरास ३५० हून अधिक नागरिकांचा लाभ
![]()
राजमाता जिजाऊ–स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त धरणगावात महा-आरोग्य पर्व
श्री चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालयाच्या मोफत तपासणी शिबिरास ३५० हून अधिक नागरिकांचा लाभ
धरणगाव प्रतिनिधी –
श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने आयोजित मोफत महा-आरोग्य होमिओपॅथी तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धरणगाव येथील साने पटांगण येथे माँसाहेब राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा सुमारे ३५० हून अधिक महिला-पुरुष ग्रामस्थांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. लीलाताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्या म्हणाल्या, “सदृढ आरोग्य राखणे ही आजच्या काळाची गरज असून, अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतो.” त्यांच्या या उद्गारांनी आरोग्यसेवेच्या सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकला.
शिबिरात श्री पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची सखोल आरोग्य तपासणी केली. यामध्ये डॉ. नरेंद्र शर्मा, डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव तसेच नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिली. रुग्णांना आवश्यकतेनुसार सल्ला व औषधोपचार देण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ज्युनियर व सिनियर प्रशिक्षणार्थी इंटर्न्स यांनी रुग्ण नोंदणी, बी.पी. व तापमान तपासणी, तसेच औषध वितरण आदी कामांमध्ये मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या नियोजनबद्ध व सेवाभावी कार्यामुळे शिबिर सुरळीत पार पडले.
या उपक्रमासाठी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्री. नवल परदेशी, ग्रामस्थ विनोद रोकडे तसेच मा. नगराध्यक्ष निलेश चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे भविष्यातही अशा प्रकारची मोफत आरोग्य तपासणी शिबिरे पुन्हा आयोजित केली जातील, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.


