राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर : अमळनेरमध्ये जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा
![]()
राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर : अमळनेरमध्ये जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी :
सर्व जिजाऊप्रेमी, शिवप्रेमी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिजाऊ जन्मोत्सव २०२६ निमित्त अमळनेर शहरात राजमाता जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदना कार्यक्रम अत्यंत श्रद्धा व उत्साहात संपन्न झाला.
धुळे रोडवरील जिजाऊ प्रवेशद्वार, अमळनेर येथे दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित या कार्यक्रमास शहरातील विविध सामाजिक, राजकीय व महिला संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास मा. प्रशांत निकम (उपनगराध्यक्ष, नगरपालिका अमळनेर) तसेच सौ. स्वप्ना विक्रांत पाटील (नवनिर्वाचित नगरसेविका, अमळनेर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मराठा सेवा संघ अमळनेरचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रशांत निकम तसेच नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविका यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. सत्कारप्रसंगी मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांची आजच्या समाजाला किती गरज आहे हे अधोरेखित केले.
राजमाता जिजाऊ यांचे कार्य हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून, आजही समाजातील तमाम महिला वर्गासाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. “आज जिजाऊंच्या आणि सावित्रीच्या लेकी नगरपालिकेमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत, हीच त्यांच्या विचारांची खरी फलश्रुती आहे,” असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
कार्यक्रम शांततापूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून, जिजाऊंच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.


