कळमसरेच्या विकासयज्ञातील अमर ज्योत : कै. अनिताताई हरीश मराठे यांचे प्रेरणादायी कार्य सामाजिक विकासाच्या पायऱ्या चढताना कै. अनिताताईंचा न मिटणारा ठसा
![]()
कळमसरेच्या विकासयज्ञातील अमर ज्योत : कै. अनिताताई हरीश मराठे यांचे प्रेरणादायी कार्य
सामाजिक विकासाच्या पायऱ्या चढताना कै. अनिताताईंचा न मिटणारा ठसा
अमळनेर प्रतिनिधी :
कळमसरे गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडणीत ज्यांचे योगदान कायमस्वरूपी कोरले गेले आहे, अशा अमळनेर पंचायत समितीच्या कै. माजी सभापती अनिताताई हरीश मराठे यांचे कार्य आजही ग्रामस्थांच्या हृदयात जिवंत आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी कळमसरे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दाखवलेली कटिबद्धता, प्रामाणिकपणा आणि संवेदनशील नेतृत्व हे खरोखरच प्रेरणादायी ठरले आहे.
कै. अनिताताईंनी केवळ राजकीय जबाबदारी पार पाडली नाही, तर कुटुंब, समाज आणि पुढील पिढी घडवण्याची दृष्टी ठेवून कार्य केले. त्यांनी आपल्या दोन मुली, जावई, मुलगा, सून व नातवंडे यांना उच्च शिक्षणाची वाट दाखवली. “शिक्षण हाच खरा वारसा” हा विचार प्रत्यक्षात उतरवत त्यांनी पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित केले. त्यांच्या या भूमिकेतूनच सामाजिक समतेचा आणि एकोप्याचा संदेश समाजात रुजला.
त्यांचे पती अण्णासाहेब हरीश मराठे हेही मितभाषी, परंतु कर्तृत्ववान सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. कळमसरे येथे नवसाचा गणपती मंदिर स्थापन करून त्यांनी श्रद्धा व सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवला. गावातील युवकांना व्यायाम व आरोग्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी व्यायामशाळा सुरू करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. विशेष म्हणजे, दरवर्षी दिवाळीच्या सणात गोरगरीब कुटुंबांना मोफत फराळ वाटप करून सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला.
कळमसरे परिसरात अण्णासाहेबांचा मोठा मित्रपरिवार असून, त्यांच्या सामाजिक कार्याला मित्रांनी दिलेली भक्कम साथ ही या कार्याची खरी ताकद ठरली. मित्रांच्या विश्वासामुळे व सहकार्यामुळे अण्णासाहेब सामाजिक कार्यात अधिक जोमाने झोकून देऊ शकले.
कै. अनिताताई व सामाजिक कार्यकर्ते हरीश मराठे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून कळमसरे येथे व्यायामशाळा सुरू झाली. या व्यायामशाळेसाठी लागणारे बहुतांश साहित्य त्यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. यामुळे गावातील युवकांना शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासाची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
याच उपक्रमाला पुढे नेण्यासाठी कळमसरे तालुक्यातील विजय व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हरीश परशराम मराठे यांनीही स्वखर्चाने व्यायाम साहित्य पुरवून मोलाचे योगदान दिले.
एकूणच, कै. अनिताताई मराठे व अण्णासाहेब मराठे यांनी कळमसरे गावासाठी केलेले हे कार्य केवळ विकासाचे दाखले नसून, ते पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारे आदर्श आहेत. त्यांची कार्यगाथा कळमसरेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल आणि गावाच्या उज्ज्वल भविष्याचा हा नक्कीच एक मैलाचा दगड ठरेल.
शब्दांकन :
✍️ ईश्वर आर. महाजन
पत्रकार, अमळनेर
📞 9860352960



