पत्रकारांच्या प्रश्नांवर गुजरात सरकारला उत्तर द्यावे लागेल ?,अन्यथा तीव्र आदोलन छेडले जाईल !- संदीपजी काळे
1 min read

पत्रकारांच्या प्रश्नांवर गुजरात सरकारला उत्तर द्यावे लागेल ?,अन्यथा तीव्र आदोलन छेडले जाईल !- संदीपजी काळे

Loading

*पत्रकारांच्या प्रश्नांवर गुजरात सरकारला उत्तर द्यावे लागेल ?*
* *अन्यथा तीव्र आदोलन छेडले जाईल !*
*श्री संदीपजी काळे*

प्रतिनिधीः अनिल करंदकर

गुजरात राज्य शिखर अधिवेशनाची सांगता
अनेक ठरावांवर शिक्कामोर्तब, संघटनात्मक बांधणीचा पुढचा टप्पा जाहीर

८ मार्च ला सुरत येथे होणार राष्ट्रीय अधिवेशन

भरूज : गुजरात सरकारदरबारी पत्रकारांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. पत्रकारांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने आणि स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने आयोजित गुजरात राज्य शिखर अधिवेशनाची सांगता भरूज येथे झाली. या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी संदीप काळे बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी गुजरात सरकारच्या पत्रकारविरोधी धोरणांवर जोरदार टीका करत पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि हक्कांचा प्रश्न ठळकपणे मांडला.

“पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र आज त्यालाच असुरक्षिततेत ढकलले जात आहे. पत्रकार संरक्षण कायदा, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि आर्थिक स्थैर्य या मूलभूत प्रश्नांवर सरकार सातत्याने मौन बाळगते आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी ठणकावून सांगितले. अनेक वेळा गुजरात राज्य सरकारकडे मागण्या करूनही पत्रकारांचे मूलभूत प्रश्न सरकार सोडवत नाही. ते अनेक प्रश्न ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’च्या माध्यमातून सोडवले आहेत, असेही संदीप काळे म्हणाले.

सुरत या ठिकाणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’च्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय शिखर अधिवेशन होणार आहे. गुजरात मधील सर्व पदाधिकारी आणि देशातील सर्व राज्याचे अध्यक्ष या अधिवेशनामध्ये सहभागी होतील, अशी घोषणा संदीप काळे यांनी या अधिवेशनात केली तर गुजरातचे प्रदेशाध्यक्ष हितेश मारू यांनी या अधिवेशनाला घेऊन आपली तयारी सुरू झाली असल्याचे नमूद केलं. हे अधिवेशन देशासाठी एक नवीन पर्वणी ठरणार आहे.

या आज झालेल्या अधिवेशनात संघटनात्मक बांधणीच्या पुढील टप्प्याची सविस्तर रूपरेषा मांडण्यात आली. डिजिटल माध्यमातील पत्रकारांना संघटनेशी अधिक प्रभावीपणे जोडण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कायदेशीर मदत कक्ष स्थापन करण्यात येणार असून पत्रकारांच्या अडचणींसाठी तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारली जाणार आहे. नव्या पत्रकारांसाठी प्रशिक्षण, कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रम राबवले जाणार असून महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यासपीठ आणि संरक्षणात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. हे सर्व उपक्रम पुढील टप्प्यात टप्प्याटप्प्याने राबवले जातील, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार कल्याण निधी, आरोग्य विमा, निवास सुविधा, मानधन व मान्यता यांसह विविध विषयांवरील अनेक ठरावांना एकमताने मंजुरी देण्यात आली. हे सर्व ठराव सरकारपर्यंत अधिकृतरीत्या पोहोचवले जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’चे गुजरात प्रदेश अध्यक्ष हितेश मारू, प्रदेश महासचिव किरण कुमार क्रिस्टी, भरूचचे पदाधिकारी जयेश भिमडा, भरूच उपप्रमुख खालिद शेख, गुजरात राज्य सचिव उदय छासिया, गुजरात राज्य कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. नवीन चौहान यांच्यासह अनेक पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनाच्या माध्यमातून गुजरातमधील पत्रकारांच्या प्रश्नांवर एकसंघ लढा उभारण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.

_____________________________

फोटो ओळ :
भरूज येथे आयोजित ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’च्या गुजरात राज्य शिखर अधिवेशनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना संस्थापक, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे गुजरात प्रदेश अध्यक्ष हितेश मारू, प्रदेश महासचिव किरण कुमार क्रिस्टी, भरूचचे पदाधिकारी जयेश भिमडा, भरूच उपप्रमुख खालिद शेख, गुजरात राज्य सचिव उदय छासिया, गुजरात राज्य कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. नवीन चौहान व इतर मान्यवर.

___________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *