अमळनेरला शहरातील मुख्य रस्त्यावर फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची गरज – समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा : सुनील महाजन
![]()
अमळनेरला शहरातील मुख्य रस्त्यावर फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची गरज – समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा : सुनील महाजन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील कांच माळी, फुल माळी तसेच इतर समविचारी समाजातील बांधवांनी आता एकत्र येऊन ऐतिहासिक व प्रेरणादायी निर्णय घ्यावा, असे आवाहन स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल तथा नव परिवर्तनवादी समाजसेवक सुनील दयाराम महाजन यांनी केले आहे.
सध्या राज्यात सर्वांचे लाडके, जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे मा. मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या पक्षाची सत्ता असून, अमळनेर नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर साहेब कार्यरत आहेत. ही अनुकूल राजकीय व प्रशासकीय परिस्थिती समाजहिताचे, दीर्घकालीन व प्रेरणादायी कार्य पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
समाजाचे आद्य समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व स्त्रीशिक्षणाच्या जननी आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे स्मरण कायम राहावे, तसेच नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी अमळनेर शहरातील मुख्य धुळे रोडवर तिरंगा चौक ते तहसील कार्यालय दरम्यान फुले दांपत्याचा भव्य व सन्माननीय पुतळा उभारण्यात यावा, अशी ठाम मागणी सुनील महाजन यांनी व्यक्त केली आहे.
हा परिसर शहराचा मुख्य दळणवळण मार्ग असून येथे उभारण्यात येणारा पुतळा सामाजिक समतेचा, शिक्षणाचा व मानवतेचा संदेश देणारा ठरेल. समाजातील प्रत्येक घटकाने, युवकांनी, ज्येष्ठांनी व महिला वर्गाने एकत्र येत लोकप्रतिनिधी, नगरपरिषद व प्रशासनाकडे निवेदन देण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
फुले दांपत्याचे विचार केवळ पुतळ्यापुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणणे ही खरी श्रद्धांजली ठरेल. सामाजिक एकोपा, शिक्षण, समता व न्याय या मूल्यांचा जागर व्हावा, यासाठी हा पुतळा उभारणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
समाजबांधवांनी व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने पुढाकार घेतल्यास हा ऐतिहासिक निर्णय नक्कीच प्रत्यक्षात येईल, असा विश्वासही सुनील दयाराम महाजन
(स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल तथा नव परिवर्तनवादी समाजसेवक)
यांनी यावेळी व्यक्त केला.
.

