अमळनेर तालुक्यातील २१ शाळांतील विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरला शैक्षणिक व अनुभवसंपन्न दौरा
![]()
अमळनेर तालुक्यातील २१ शाळांतील विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरला शैक्षणिक व अनुभवसंपन्न दौरा
अमळनेर प्रतिनिधी
मारवड व परिसर विकास मंच तसेच मिल के चलो असोसिएशन, तर्फे २१ शाळांमध्ये घेण्यात आलेल्या डॉ. कलाम विज्ञान संशोधन परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच आयोजित करण्यात आली.
या सहलीत २१ शाळांमधून प्रत्येकी तीन विद्यार्थी आणि एक शिक्षक सहभागी झाले होते. एकूण २६विद्यार्थी,३१ विद्यार्थिनी,२१शिक्षक,४ शिक्षिका असा सहभाग होता. सहलीसाठी दोन एस.टी. बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी वेरूळ येथील लेण्यांना भेट देत एकाच दगडातून वरून खाली कोरलेल्या कैलासलेणीचे अद्भुत शिल्पकौशल्य अनुभवले. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील बेलराईज कंपनीला भेट देऊन आधुनिक उद्योगविश्वाची प्रत्यक्ष ओळख करून घेतली. बीबीका मकबरा येथे मुघलकालीन इतिहासाची माहिती मिळाली, तर सिद्धार्थ गार्डनमधील निसर्गसौंदर्य , देवगिरी किल्ल्याच्या गौरवशाली इतिहासासह भद्रा मारुती मंदिर दर्शनाचाही या सहलीत समावेश होता.
या सर्व अनुभवांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वात भर पडली असून जिज्ञासा, आत्मविश्वास व उज्ज्वल भविष्यासाठीची प्रेरणा निर्माण झाली. ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी सुवर्णक्षण ठरली आहे.
ही सहल नागपूरचे आयकर आयुक्त संदीप साळुंखे, आदिवासी विकास आयुक्तालय नासिकचे सहआयुक्त कपिल पवार आणि मिल के चलो अभियानाचे संचालक अनिरुद्ध पाटील यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. सहल अधिक नियोजनबद्ध व सुकर होण्यासाठी देवेंद्र साळुंखे, महेश पाटील, विनायक पाटील, अतुल सैंदाणे, चेतन वैराळे आणि अशोक पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच डी. ए.धनगर, उमेश काटे आणि निरंजन पेंढारे,भारती बहिरम, अनिता बोरसे, यांचे मार्गदर्शन लाभले.
ज्ञान, अनुभव आणि प्रेरणेचा हा प्रवास सर्व सहभागींसाठी कायम स्मरणात राहणारा ठरला आहे.

