आयतं पोयतं सख्यानं”ने रंगमंच गाजवला अहिराणी एकपात्री नाटकातून प्रविण माळी यांचे सशक्त सादरीकरण रंगमंच, भावभावना आणि अभिनयाचा संगम प्रताप महाविद्यालयातील एकपात्री नाट्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
“आयतं पोयतं सख्यानं”ने रंगमंच गाजवला
अहिराणी एकपात्री नाटकातून प्रविण माळी यांचे सशक्त सादरीकरण
रंगमंच, भावभावना आणि अभिनयाचा संगम
प्रताप महाविद्यालयातील एकपात्री नाट्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त “एकपात्री नाट्य कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा दि. ७ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयातील पूज्य. साने गुरुजी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या कार्यशाळेसाठी शिरपूर येथील सुप्रसिद्ध कलावंत मा. प्रविण माळी हे मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. ही कार्यशाळा दोन सत्रांत पार पडली. सकाळच्या सत्रात प्रविण माळी यांनी एकपात्री नाटकाची संकल्पना, त्याचा ऐतिहासिक प्रवास, आशय निवड, व्यक्तिरेखा उभारणी, संवादफेक, आवाजातील चढउतार, देहबोली, हालचाली तसेच प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याच्या विविध पद्धती यांवर सविस्तर विवेचन केले. यावेळी ते म्हणाले की, “एकपात्री नाटक हे केवळ अभिनयाचे माध्यम नसून कलाकाराच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे प्रभावी प्रकटीकरण करणारे कलारूप आहे.”
दुपारच्या सत्रात त्यांनी “आयतं पोयतं सख्यानं” या अहिराणी एकपात्री नाटकाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या सादरीकरणातून भावनिर्मिती, भाषेचे विविध लहेजे, हालचाली आणि रंगमंचावरील उपस्थिती यांचे सूक्ष्म बारकावे प्रेक्षकांसमोर उलगडले.
प्रस्तुत कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, डॉ.व्ही बी मांटे, डॉ. तोरवणे, मराठी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. रमेश माने, प्रा. योगेश पाटील, डॉ. विलास गावीत,डॉ.निलेश चित्ते,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.अरविंद भंडारे(पारोळा), प्रा. तुषार पाटील, प्रा. सागर सैंदाणे, प्रा. गोपाल बडगुजर, डॉ. ज्ञानसागर सूर्यवंशी तसेच विविध विभागांतील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. सागर सैंदाणे यांनी करून दिला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपाल बडगुजर यांनी केले. डॉ. ज्ञानसागर सूर्यवंशी यांनी आभार मानल्यानंतर कार्यशाळेची सांगता झाली.

