दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ मध्ये अनुपमा जाधव यांना अध्यक्षपदाचा मान; ‘माय सावित्री’ कवितेने रसिक मंत्रमुग्ध
1 min read

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ मध्ये अनुपमा जाधव यांना अध्यक्षपदाचा मान; ‘माय सावित्री’ कवितेने रसिक मंत्रमुग्ध

Loading

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ मध्ये अनुपमा जाधव यांना अध्यक्षपदाचा मान; ‘माय सावित्री’ कवितेने रसिक मंत्रमुग्ध

अमळनेर प्रतिनिधी :
दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ पुणे येथे उत्साहात पार पडला. या प्रतिष्ठित महोत्सवात के. एल. पोंदा येथील उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार व समाजसेविका अनुपमा जाधव यांची कविता सादरीकरण काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या या निवडीमुळे साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा प्रचार-प्रसार करणे तसेच भारतीय संविधानाविषयी जनजागृती करणे, या उदात्त उद्देशाने देशात पहिल्यांदाच गतवर्षी पुणे येथे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलची सुरुवात झाली होती. या महोत्सवाचे दुसरे वर्ष जानेवारी २०२६ मध्ये साजरे करण्यात आले. त्या अंतर्गत पुणे येथे भव्य काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये अनुपमा जाधव यांना अध्यक्षस्थान लाभले. यावेळी त्यांनी सादर केलेली ‘माय सावित्री’ ही कविता उपस्थित रसिकांच्या मनाला स्पर्शून गेली. सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षमय जीवनाचे, त्यागाचे व स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचे प्रभावी शब्दचित्र त्यांनी आपल्या कवितेतून उभे केले.
देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा, पुणे येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाची मूळ संकल्पना व मार्गदर्शन कवी विजय वडवेराव सर यांचे होते. फेस्टिव्हलचे आयोजन यशस्वी करण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. प्रत्येक सहभागी कवी-लेखकाची आपुलकीने विचारपूस करण्यात आली. तसेच चहा-नाश्ता, भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सहभागी सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आल्याने संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये आनंदाचे जणू उधाण आले होते.
या प्रसंगी अनुपमा जाधव यांचा संविधानमय शालेय पॅड, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व साडी देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यवर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अनुपमा जाधव यांचे ‘समुद्रसंगीत’, ‘वहिवाट’, ‘रानझरा’ हे काव्यसंग्रह तसेच ‘अनुबंध’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. आकाशवाणी मुंबई, नाशिक, पुणे येथे त्यांनी कविता वाचन, कथाकथन तसेच पर्यावरण जनजागृतीचे विविध कार्यक्रम सादर केले आहेत.
याशिवाय त्यांनी तीन गीतांची निर्मिती केली असून त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान प्रबोधन गीत, ‘चला प्रदूषण दूर करू या!’ आणि गौरव गीत यांचा समावेश आहे. डहाणू नगरपरिषदेच्या घंटागाडीवरही त्यांचे गीत वाजवले जाते. अशा प्रकारे साहित्य, शिक्षण, पर्यावरण व समाजप्रबोधन या सर्व क्षेत्रांत कार्यरत असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे.
या निवडीसाठी व मिळालेल्या सन्मानासाठी त्यांच्या नातेवाईकांसह शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोपान इंगळे सर, उपमुख्याध्यापिका सौ. रसिका घागस मॅडम, कॉलेजचे उपप्राचार्य श्री. शशिकांत चव्हाण सर, पर्यवेक्षिका सौ. मनीषा पटेल मॅडम, शिक्षक-शिक्षिका, पालकवर्ग व विद्यार्थी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. परिसरातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *