पाडळसरे धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी; जनआंदोलन समितीचा सकारात्मक पाठपुरावा, निधी व प्रगतीचा घेतला आढावा
![]()
पाडळसरे धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी; जनआंदोलन समितीचा सकारात्मक पाठपुरावा, निधी व प्रगतीचा घेतला आढावा
अमळनेर प्रतिनिधी :
निम्न तापी प्रकल्पाअंतर्गत पाडळसरे धरणाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रत्यक्ष धरणस्थळी भेट देण्यात आली. यावेळी शासनाकडून प्राप्त झालेला निधी, झालेला खर्च तसेच प्रत्यक्ष बांधकामाची प्रगती याबाबतची सविस्तर माहिती आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
निम्न तापी प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्यानंतर महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या संदर्भात जनआंदोलन समिती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत आहे. याच पार्श्वभूमीवर धरणाच्या बांधकामाची वस्तुस्थिती, प्रगती आणि पुनर्वसनाच्या प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी धरणस्थळी उपस्थित राहिले.
या पाहणी दौऱ्यात जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेंद्र बोरसे, महेश पाटील, देविदास देसले यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. धरणाचे काम गतिमान व कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे, तसेच बांधकामातील प्रशासनिक, तांत्रिक व आर्थिक अडचणी कोणत्या आहेत, याबाबत समितीने संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून सविस्तर माहिती घेतली.
यावेळी झालेल्या बैठकीत निम्न तापी प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता वाय. एम. कडलक यांनी उपस्थितांना धरणाच्या कामाची सविस्तर माहिती दिली. धरणाचे बांधकाम करताना अनेक बाबी एकाचवेळी पूर्ण कराव्या लागतात, अन्यथा पाणी साठा डोळ्यांसमोर असूनही प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे विविध टप्प्यांवर आवश्यक असलेली कामे समांतरपणे केली जात असून, पाणी साठा सुरू होईपर्यंत लोकांना पाणीपुरवठा करता यावा, या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भूसंपादन व पुनर्वसनाच्या प्रक्रियेसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या धरणाच्या कामात कोणतीही मोठी तांत्रिक अडचण नसल्याचे सांगत, नदी वर्षातील सुमारे सहा महिने वाहती असल्यामुळे कामासाठी मर्यादित कालावधी मिळतो, तरीही पूर्ण क्षमतेने बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पाडळसरे धरण हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे गेट असलेल्या धरणांपैकी एक असून, अत्यंत बारकाईने व तांत्रिकदृष्ट्या काटेकोरपणे काम करावे लागत असल्याने काही प्रमाणात वेळ लागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या मनुष्यबळ कमी असले तरी लवकरच आवश्यक कर्मचारी उपलब्ध होतील, अशी माहिती देत शासनाकडून प्राप्त व खर्च झालेल्या निधीचा तपशील उपअभियंता भटूरकर यांच्या उपस्थितीत समितीच्या पदाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला.
याप्रसंगी जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी समितीची भूमिका सविस्तरपणे मांडली. बैठकीचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले तर आभार सुनील पाटील यांनी मानले. या पाहणी व बैठकीस भरतसिंग परदेशी, एन. के. पाटील, ॲड. कुंदन साळुंखे, डॉ. संजय पवार, रहेमतुल्ला पिंजारी, सुशील भोईटे, प्रसाद चौधरी, सतीश काटे, डी. के. पाटील, प्रविण संदानशिव, पुरुषोत्तम शेटे, ज्ञानेश्वर वारुळे, दिनेश पाटील, गुलाब पाटील, मोहन तिलक, गौतम संदानशिव, रमेश चव्हाण, भगवान कोळी, माधव पाटील, सुपडू बैसाणे, नारायण बडगुजर, संजय सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, कार्यकारी अभियंता वाय. एम. कडलक यांनी जनआंदोलन समितीच्या सकारात्मक भूमिकेबद्दल शासनाच्या वतीने आभार मानले. अनेक ठिकाणी जनआंदोलन हे प्रकल्पांच्या विरोधात असते, मात्र पाडळसरे धरण जनआंदोलन समिती ही कायम धरणाच्या व प्रशासनाच्या पाठीशी उभी असून, विविध टप्प्यांवर प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशी सकारात्मक भूमिका फारच दुर्मिळ असून, पाडळसरे धरण प्रकल्पासाठी ती अत्यंत मोलाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

