अकोल्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन सोहळा उत्साहात संपन्न ४० पत्रकारांना राज्यस्तरीय गौरव; अकोल्यात पत्रकारितेचा सन्मानोत्सव
![]()
अकोल्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन सोहळा उत्साहात संपन्न
४० पत्रकारांना राज्यस्तरीय गौरव; अकोल्यात पत्रकारितेचा सन्मानोत्सव
अकोला प्रतिनिधी
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अ.भा. समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून स्थानिक जठारपेठ चौकातील जैन रेस्ट्रो सभागृहात पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियात कार्यरत असलेल्या ४० पत्रकारांचा शाल व “लोकस्वातंत्र्य पत्रकार भूषण सेवा गौरव” व “लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता गौरव” या राज्यस्तरीय पुरस्कारांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अकोला शहर व जिल्ह्यातील पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, दैनिक नवभारत चे जिल्हा प्रतिनिधी दिनेश शुक्ला, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, स्तंभलेखक प्रा. मोहन खडसे, लोकमत समाचार च्या वृत्तसंपादिका निशाली पंचगाम, दैनिक देशोन्नती चे वृत्त संपादक माणिकराव कांबळे, श्रमिक पत्रकार संघाचे महेंद्र कवीश्वर, पत्रकार संघाचे खामगाव येथील पदाधिकारी जगदीश अग्रवाल, सागर मोदी,बुलढाणा जिल्हाध्यक्ष संभाजीराव टाले उपस्थित होते.
सर्वप्रथम आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी केले. लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींचा सन्मान करून त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, पत्रकारांचे कार्य देश रक्षण करणाऱ्या एखाद्या सैनिका सारखे असते. वाईट प्रवृत्तींवर प्रहार करून एक सुदृढ समाज निर्माण करण्याचे कार्य ते करीत असतात.
महेंद्र कवीश्वर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पत्रकारांची एखादी लहानशी बातमी सुद्धा मोठा चमत्कार घडवू शकते. पत्रकारांनी खंबीर राहून आपले कार्य इमाने इतबारे केल्यास समाजातील वाईट प्रवृत्तीस निश्चितच त्यांचा धाक वाटेल. दिनेश शुक्ला आपल्या मनोगतात म्हणाले की, या बदलत्या युगात पत्रकारितेच्या क्षेत्रात कितीही आधुनिकता आली तरी प्रिंट मीडियाचे महत्त्व ध्रुव बाळासारखे अभाधितच राहील. प्रा. मोहन खडसे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पत्रकारांनी सकारात्मक वृत्तीने आपली लेखणी समाजाच्या हितासाठी झिजवली पाहिजे.
प्रदीप खाडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, पत्रकारांनी जनतेच्या समोर सत्य परिस्थिती ठासून मांडली पाहिजे. परंतु हे कार्य करीत असताना आपल्या जीवितस कुठे इजा होणार नाही याचीही दक्षता त्यांनी आपल्या कुटुंबाकडे बघून घेतली पाहिजे. प्रख्यात समाजसेवक धनंजय मिश्रा, पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र देशमुख, मराठी साहित्य संघाचे सदस्य युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, प्रा. किरण वाघमारे,बुडन गाडेकर, समाजसेवक गजानन हरणे, नारायणराव अंधारे, अनिल मावळे, श्रीकृष्ण माळी, राजेंद्र खारोडे, सिद्धेश्वर देशमुख, सागर लोडम, मनोहर मोहोड,नवले, सतीश देशमुख आणि पत्रकार बांधवांसह ९० जणांची मोठ्या संख्येत उपस्थित होती.कार्यक्रमाचे संचालन सौ.जया भारती यांनी तर आभार प्रदर्शन सौ.दिपाली बाहेकर यांनी केले.

