धरणगावात पत्रकार दिन उत्साहात साजरा ; सत्यशोधक समाज संघाकडून पत्रकारांचा सन्मान
![]()
धरणगावात पत्रकार दिन उत्साहात साजरा ; सत्यशोधक समाज संघाकडून पत्रकारांचा सन्मान
धरणगाव प्रतिनिधी- पी डी पाटील सर
धरणगाव : शहरातील कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकजवळ आद्य मराठी पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील पहिले दर्पण नावाचे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी सुरू करून पत्रकारितेचा पाया रचला, यानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पत्रकारितेच्या आद्य प्रेरणेला अभिवादन केले. प्रास्ताविक पत्रकार विनोद रोकडे यांनी केले. पत्रकारितेचे सामाजिक भान, लोकशाहीतील माध्यमांची भूमिका व सत्यनिष्ठ पत्रकारितेचे महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रा. डी. आर. पाटील सर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी पत्रकारांनी निर्भीड, निष्पक्ष व समाजहिताचे लेखन तसेच पत्रकारितेच्या मूल्यांचा जागर करण्याची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले. यावेळी सत्यशोधक समाज संघाच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना २०२६ सालची ‘सत्यशोधक दिनदर्शिका’ भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली. या उपक्रमाबद्दल पत्रकार बांधवांनी समाधान व्यक्त करत सत्यशोधक समाज संघाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला धरणगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार डी. एस. पाटील सर, बी. आर. महाजन, राजेंद्र वाघ, जितेंद्र महाजन, पी. डी. पाटील, भगीरथ माळी, धर्मराज मोरे, विनोद रोकडे, राजेंद्र रडे, सतीश बोरसे, निलेश पवार, सतीश शिंदे, ॲड. व्ही एस भोलाणे, विकास पाटील यांच्यासह शिवसेना (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, जानकीराम पाटील, माजी नगरसेवक भागवत चौधरी, जितू धनगर, हेमंत माळी, गोरख देशमुख, गजानन महाजन, जिभाऊ पाटील, आदी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
*▪️फोटो कॅप्शन*
पत्रकार दिनानिमित्त सत्यशोधक समाज संघातर्फे शहरातील सर्व पत्रकारांना सत्यशोधक दिनदर्शिका भेट देताना मान्यवर पदाधिकारी व उपस्थित पत्रकार बांधव.

