पारोळा येथे रंगणार नाशिक विभाग व जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे संयुक्त अधिवेशन
![]()
पारोळा येथे रंगणार नाशिक विभाग व जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे संयुक्त अधिवेशन
पारोळा प्रतिनिधी):
ग्रंथालय चळवळीला नवी दिशा देणारे व वाचनसंस्कृतीला बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल उचलत, जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ व नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे सन २०२५–२६ या वर्षाचे संयुक्त वार्षिक अधिवेशन पारोळा तालुक्यात आयोजित करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पारोळा येथील श्रीनिवास भाऊ वाचनालय व ग्रंथालयात झालेल्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष श्री. शशिकांत पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघाचे अध्यक्ष श्री. सतीश पाटील सर उपस्थित होते. यावेळी संघाचे उपाध्यक्ष श्री. रवींद्र पाटील, धरणगाव संघाचे कार्यवाह श्री. संजय पाटील, अमळनेरचे सदस्य श्री. किशोर पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना श्री. गणेश देशमुख, पाचोराचे श्री. नाना मोरे, चोपड्याच्या कविता पाटील, भुसावळचे श्री. दीपक पाटील, चाळीसगावचे श्री. भिवसन पाटील, एरंडोलचे ईश्वर पाटील, धरणगावचे दीपक पाटील, यावलचे जाहीर खान आदी मान्यवर व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन संघाचे व्यवस्थापक श्री. भगुरे सर यांनी केले. अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा करत, लवकरच पारोळा तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. विभागीय अधिवेशनाचे यजमानपद पारोळा तालुक्याला मिळाल्याने उपस्थित सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त करत नाशिक विभाग व जिल्हा संघाचे आभार मानले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष श्री. सतीश पाटील सर यांनी, “या संयुक्त अधिवेशनामुळे जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीला नवी उभारी मिळेल, वाचकवर्ग वाढीस लागेल आणि सांस्कृतिक जडणघडण अधिक मजबूत होईल,” असा विश्वास व्यक्त केला. अखेरीस सर्व उपस्थितांचे आभार मानून बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
पारोळा येथे होणारे हे अधिवेशन ग्रंथालय क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

