सावित्रीमाई फुलेंचे जीवनकार्य सर्वांसाठीच दिशादर्शक — प्रा.डॉ. राहुल निकम , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वस्तीगृह, अमळनेर येथे जयंती उत्साहात संपन्न
![]()
सावित्रीमाई फुलेंचे जीवनकार्य सर्वांसाठीच दिशादर्शक — प्रा.डॉ. राहुल निकम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वस्तीगृह, अमळनेर येथे जयंती उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र म्हणजे अखंड उर्जेचा स्त्रोत असून तो समाजातील सर्वच घटकांसाठी दिशादर्शक आहे. सावित्रीबाई फुले यांनी फक्त शाळा निर्माण केल्या नाहीत तर शाळांमधून ‘माणूस’ निर्माण करण्याची कार्य केले आहे. स्वतः दगड धोंडे शिव्या शाप सहन करीत बहुजनांच्या लेकींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. विधवा काशीबाईचे बाळंतपण तर केलेच पण काशीबाईच्या मुलाला दत्तक घेऊन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळून त्याला डॉक्टर बनवले. सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवन प्रेम, सामाजिक संवेदनशीलता, सामाजिक न्याय, त्याग, करुणा, समर्पण, विज्ञाननिष्ठता इत्यादींचे द्योतक असल्याचे मत समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील प्रा.डॉ. राहुल निकम यांनी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वस्तीगृह, अमळनेर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
या वेळी विचारपीठावर वस्तीगृहाचे अधीक्षक धनंजय सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे, हृदयनाथ मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. वस्तीगृहाचे अधीक्षक धनंजय सपकाळे यांनी वस्तीगृहात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांशी माहिती दिली. गौतम मोरे यांनी सावित्रीबाई समाजाच्या सर्व घटकांप्रती संवेदनशील असल्याचे मत व्यक्त करीत त्यांचे जीवन दिशादर्शक असल्याचे सांगितले. हृदयनाथ मोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुद्धोधन बागुल यांनी केले. कार्यक्रमास वस्तीगृहातील बहुसंख्य विद्यार्थी कर्मचारी वृंद उपस्थित होते. याच कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती देणारे माहितीपत्र युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर आणि संविधान जागर अभियान निमंत्रक समिती यांच्यावतीने प्रा.अशोक पवार यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटण्यात आले.

