दिव्यांगांच्या कलागुणांना रंगमंचावर नवे पंख , बाल रंगभूमी परिषदेत ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ नाटिकेने वेधले लक्ष**
![]()
**दिव्यांगांच्या कलागुणांना रंगमंचावर नवे पंख
बाल रंगभूमी परिषदेत ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ नाटिकेने वेधले लक्ष**
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दि. २ जानेवारी २०२६ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद, मुंबई यांच्या वतीने आयोजित दिव्यांग महोत्सव जळगाव जिल्ह्यात उत्साहात पार पडला. या महोत्सवात जिल्ह्यातील १३ दिव्यांगांच्या विशेष शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक काकाजी श्री. रजनीकांत कोठारी, श्री. प्रविणकुमार सिंग (झोनल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र), श्री. योगेश पाटील (सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव), श्री. पद्मनाथ म्हस्के (जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जि. प. जळगाव), नंदकुमार जुवेकर (कोषाध्यक्ष, बाल रंगभूमी परिषद, मुंबई), श्री. हेमंत कुलकर्णी (बाल रंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा) यांच्यासह योगेश शुक्ल, विनोद ढगे सर, राहुल पाटील सर (उत्कर्ष मतिमंद विद्यालय, जळगाव) आदी मान्यवर उपस्थित होते.
चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथील विशेष विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सादर केलेली “मोबाईलचे दुष्परिणाम” ही समाजप्रबोधनपर नाटिका विशेष ठरली. मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम प्रभावी अभिनयातून मांडत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. उपस्थित प्रमुख पाहुणे व श्रोत्यांकडून या नाटिकेला उत्स्फूर्त दाद मिळाली.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक मनिष किसन जाधव यांचा श्री. आकाश बाविस्कर (मुख्य संपादक, जळगाव समाचार) यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. विशेष शिक्षक हेमंत महाजन, आर. एस. शेलकर, जगदीश सोनवणे, प्रशांत महाजन, सविता पाटील, संगिता महाजन, कुणाल महाजन, हर्षल महाजन, मनोहर पाटील यांना सौ. नेहा पवार (जळगाव) यांच्या हस्ते सन्मानपदक प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, सर्जनशीलता व समाजप्रबोधनाच्या भूमिकेचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. हा दिव्यांग महोत्सव सामाजिक जाणिवा जागवणारा आणि प्रेरणादायी ठरला.

