क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘सावित्रीच्या लेकीचा’ सन्मान — सौ. सुषमाताई देसले पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘सावित्रीच्या लेकीचा’ सन्मान — सौ. सुषमाताई देसले पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार
अमळनेर प्रतिनिधी : (ईश्वर महाजन)
आष्टी (जि. बीड) येथे ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत सामाजिक व ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांचा गौरव करण्यात आला. गंगाई बाबाजी राज्यस्तरीय ‘आदर्श महिला सरपंच व समाजकार्य’ पुरस्कार प्रदान करून स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देत त्यांचा सन्मान करण्यात आला. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकीचा’ सन्मान ही अभिमानास्पद बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हा भव्य सत्कार सोहळा गेवराईचे माजी मंत्री मा. शिवाजीराव दादा पंडित, शेतकरी शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार भीमराव धोंडे साहेब तसेच सौ. दमयंती ताई धोंडे यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुशीला ताई मोराळे, श्री. सुभाष सारडा, तसेच प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद श्री. दत्ताभाऊ काकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सौ. सुषमाताई देसले पाटील यांनी सरपंचपदाच्या कार्यकाळात महिलासक्षमीकरण, ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व सामाजिक ऐक्य यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. विशेष म्हणजे पर्यावरण संरक्षणाचा वसा जपत त्यांनी वृक्षलागवड व संवर्धनासाठी पुढाकार घेतला असून अनेक गावांमध्ये झाडे लावण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विकासात्मक उपक्रमांमुळे गावाचा सर्वांगीण विकास साध्य झाला असून समाजात सकारात्मक बदल घडून आला आहे.
कार्यक्रमात मान्यवरांनी सौ. सुषमाताई यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद करत, त्यांच्या समाजाभिमुख आणि प्रेरणादायी कार्यामुळे इतर महिला नेतृत्वालाही दिशा मिळत असल्याचे सांगितले. सत्कार प्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
दरम्यान, या पुरस्काराबद्दल अमळनेर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सौ. सुषमाताई देसले पाटील यांचे अभिनंदन केले असून हा सन्मान संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाचा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

