नगरपालिका निवडणुकीनंतर काही वक्तव्यांबाबत आमदार अनिल पाटील यांची पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट
1 min read

नगरपालिका निवडणुकीनंतर काही वक्तव्यांबाबत आमदार अनिल पाटील यांची पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट

Loading

नगरपालिका निवडणुकीनंतर काही वक्तव्यांबाबत आमदार अनिल पाटील यांची पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट

अमळनेर प्रतिनिधी :
नगरपालिका निवडणुकीनंतर घडलेल्या काही घटनांबाबत आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. गेल्या सहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात काही अनुचित बाबींना आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निवडणूक निकालानंतर अवघ्या दहा दिवसांत काही वक्तव्यांमुळे पुन्हा वादाचे वातावरण निर्माण झाले, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, शिवसेनेचे डॉ. बाविस्कर नगराध्यक्षपदी निवडून आले असून लोकशाही प्रक्रियेचा आम्ही आदर केला आहे. संख्याबळाच्या दृष्टीने आमचे काही नगरसेवक अधिक असतानाही निकाल स्वीकारत आम्ही विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतली व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या.
मात्र पदग्रहण सोहळ्याच्या वेळी केलेल्या काही वक्तव्यांमुळे समाजात गैरसमज निर्माण झाले. संत सखाराम महाराज व पु. सानेगुरुजी यांच्या विचारांच्या भूमीत महिलांविषयी अवमानकारक भाष्य होणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा वक्तव्यांना टाळ्या वाजवल्या गेल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.
महिला सार्वजनिक जीवनात, नोकरीत किंवा उद्योगात सक्रिय असणे ही सशक्त समाजाची निशाणी असल्याचे सांगत, त्यांच्या योगदानाचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे आमदार पाटील म्हणाले. आपल्या पत्नीनेही अनेक वर्षांपासून जनसेवेचे कार्य केले असून ते पुढेही सुरू राहील, असे त्यांनी नमूद केले.
विकासकामांबाबत होत असलेल्या टीकेवर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, शहरातील अनेक रस्ते व पायाभूत सुविधा त्यांच्या कार्यकाळात उभारण्यात आल्या आहेत. भविष्यात शहरातील कोणताही भाग पाहिला तरी झालेला विकास नागरिकांना दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवटी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, महिला सन्मान व सक्षमीकरणाला बाधा येईल अशा कोणत्याही प्रवृत्तीला विरोध केला जाईल. आई-बहिणींचा सन्मान राखणे ही आमदार म्हणून आपली जबाबदारी असून ती जबाबदारी आपण पार पाडणारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमळनेरच्या जनतेला सौहार्द, विकास व सुसंस्कृत राजकारण अपेक्षित आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *