स्त्री मुक्तीच्या आद्य क्रांतिकारी माता – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
![]()
स्त्री मुक्तीच्या आद्य क्रांतिकारी माता – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
हजारो वर्ष परंपरेच्या खायीत बुडालेला हा भारतीय समाज होता. यात उच्च निचतेच्या आधारावर शूद्रां वर, अतिशुद्रांवर अतिशय अन्याय होत होते .विचाराची शृंखला खंडित झालेली होती. धर्मचिकित्सा करणे पाप समजले जात होते. स्त्रियांवर च्या अन्यायावर बोलण्याची बंदी होती. विधवांचे केशवपन,सतीची चाल अशा असंख्य अनिष्ट रूढी असल्यामुळे हा भारतीय समाज पोखरले ला होता. स्त्री म्हणजे फक्त भोग वस्तू आणि त्यामुळे स्त्री जन्म म्हणजे पाप समजले जात होते . घरात मुलगी जन्माला आली म्हणजे दुःखाची छाया पसरे.. तसं पाहिलं तर आजही ही स्थिती काही अंशी समाजात शिल्लक आहे. आजही गर्भलिंग चिकित्सा करून मुलीचे गर्भ चोरून पाडले जात आहेत.
अशा या बुरसटलेल्या समाजात जर खरोखरच देव असता तर त्या देवालाही या स्री ची दया का येत नव्हती? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. स्रि ला भावना असतात. तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. हे तात्कालीन समाजाला मान्यच नव्हते .
अशा या विदारक परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई उभ्या राहिल्या.पुण्या सारख्या कर्मठ शहरात सामाजिक समतेची आणि बंधुतेची ज्योत पेटवतां ना या पती -पत्नी ,दोघं उभयतांना किती त्रास झाला असेल ? याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
सावित्रीबाई फुले यांच्या जन्म 3 जानेवारी 1831 रोजी शिरवळ जवळ असलेल्या नायगाव या खेड्यात झाला. शिक्षणाची, ज्ञानाची परंपरा नसलेल्या अशिक्षित खेड्यात जन्म होऊन सुद्धा समाजक्रांती साठी ज्योतिबां च्या बरोबर स्रि शिक्षणासाठी स्वतः हाती पाटी, पेन्सिल घेऊन, अ ब क ड त्या गिरवू लागल्या.
पण तो काळ तरी कसा होता? त्याकाळी स्रि शिक्षण म्हणजे पाप समजले जात होते. विद्यार्जन करणे फक्त उच्च वर्णी यांच्या अधिकारात होते. शिक्षण ही सुद्धा त्याकाळी ‘धार्मिक’ बाब होती. धर्म हा परमेश्वर निर्मित असल्यामुळे त्यात ढवळाढवळ करणे म्हणजे नरकात जाणे. असे समजले जात होते.अशा काळी धर्मचिकित्सा करणार कोण ? आणि स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडणार कोण? वास्तविक हिंदू धर्मात स्त्रियांवर जेवढे छळ अन्याय झाले तेवढे अन्न धर्मात झाले नसतील. सावित्रीबाई फुले स्वतः साक्षर होऊन स्त्रियांना साक्षर करू लागल्या .धर्माच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या समाजाने जातीबाहेर काढले तरी त्यांनी आपले कार्य खंडित होऊ दिले नाही. स्रि शिक्षणाचा झेंडा त्यांनी फडकवितच ठेवला. एवढंच नाही तर त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली. आपल्या घरातच बालहत्या प्रतिबंधक केंद्र चालवले. गोरगरीब कामगारांना रात्री शाळा सुरू करून शिक्षण दिले. विधवांचे केशव , सती प्रथा, देवदासी प्रथा, विधवा विवाह बंदी अशा अनिष्ट प्रथांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रखर लढा दिला.
वास्तविक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या हा लढा म्हणजे देशातील एक चमत्कारच होता ..!
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समकालीन बरीच मंडळी त्या काळात समाज सुधारण्यासाठी झटत होती. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकर होते ,न्यायमूर्ती रानडे होते , आगरकर होते,बाळशास्त्री जांभेकर होते .अशीही प्रामुख्याने नावे त्या काळात प्रख्यात होती. पण या मंडळीला सुद्धा स्त्री शिक्षणाचे महत्त्व समजले नव्हते .ते फक्त समाजसुधारक होते .परंतु महात्मा ज्योतिबा फुले हे क्रांती पुरुष होते ..! त्यामुळे स्त्री शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून त्यांनी केली .त्यांच्या अथक प्रयत्नांना सावित्रीबाई फुले यांचे पाठबळ मिळाले म्हणूनच भारतीय स्रि शिक्षणासाठी बाहेर पडू लागली. देवधर्म, पूजा, हळद-कुंकू याच्या पलीकडे भारतीय स्त्रीचे अस्तित्व त्या काळात नव्हते .शिक्षणामुळे ती स्री समाजातले आपले स्नान स्थान शोधू लागली .ज्ञानाची कवाडे उघडल्या मुळे तिच्या कर्तृत्व भरारी आकाशी भिडल्या. स्त्री पुरुष समान आहेत. हे त्यांनी समाजाला दाखवून दिले. सावित्रीबाईंच्या विचारात शिक्षणाचा कळवळा होता. समाजातील उच्चनीचता नष्ट करायची असेल तर विद्या वाचून पर्याय नाही. हे समाज मनात त्यांनी रुजवले .
त्याकाळी त्या म्हणत होत्या-
” मुला-मुलींना शिकवणे प्रत्येक माता-पित्याचे कर्तव्य आहे. जे शिकवणार नाहीत ते त्यांचे शत्रू आहेत असे समजावे ”
समाज परिवर्तनाची त्यांना ओढ होती .एक आदर्श समाज निर्मितीचा पाया त्यांनी घातला.
त्यामुळेच या 21व्या शतकात स्त्रियांच्या कर्तुत्वाच्या भरारी आभाळाला जाऊन भिडल्या. त्यांच्यामुळे कै.कल्पना चावला अंतराळात जाऊन अमर झाली. कै.इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होऊन जगात नाव करून गेल्या .आणखीही इतर महान स्रिया होऊन गेल्या परंतु या सत्याचा जन्म क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वामुळे झाला हे अखिल मानव जातीला मान्य करावेच लागेल.
त्यामुळेच स्रि मुक्तीच्या आद्य क्रांतिकारक माता या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ठरतात.
गोकुळ बागुल
२१, टेलिफोन कॉलनी,
अमळनेर.
मो.9422276140

