न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘व्हिजन महोत्सव’ उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती व सर्जनशीलतेचा दोन दिवसीय उत्सव
![]()
न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘व्हिजन महोत्सव’ उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती व सर्जनशीलतेचा दोन दिवसीय उत्सव
अमळनेर प्रतिनिधी :
येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन दिवसीय ‘व्हिजन महोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘फन फेअर’ (आनंद मेळावा) आयोजित करण्यात आला. यामध्ये उत्साही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकल नृत्य, एकल गीत गायन तसेच पाखवाज वादनाच्या माध्यमातून आपली कला सादर केली. उपस्थित परीक्षकांनी सर्वच विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
याच दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून चविष्ट व रुचकर पदार्थांची विक्री केली. एकूण २०–२१ स्टॉल्स लावण्यात आले असून त्यामधून उत्कृष्ट तीन स्टॉल्सना पुरस्कार देण्यात आले. या उपक्रमासाठी श्रीमती वंदना पाटील व सामाजिक कार्यकर्त्या जान्हवी बोरसे यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली.
दुसऱ्या दिवशी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या नृत्याविष्कारांनी कार्यक्रम रंगतदार झाला.
माँ सरस्वती प्रतिमेचे पूजन व गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती तसेच दक्षिण भारतीय चित्रपट व पारंपरिक संगीताच्या तालावर बहारदार नृत्यप्रस्तुती सादर केल्या. विविध भारतीय भाषांतील लोकप्रिय गीतांवर सादर झालेल्या नृत्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
या प्रसंगी वर्षभरात शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर उपक्रमांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यालय समितीचे अध्यक्ष शीतल देशमुख, चेअरमन निलेश लांडगे व धनराज महाजन, प्राचार्या सुमित्रा झाँजोटे, उपप्राचार्या दिपाली राजपूत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
व्हिजन महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले बालकलाकारांचे नाट्याविष्कार.
इंग्लिश, मराठी व हिंदी भाषांतील नाट्यप्रवेशांनी प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. इंग्लिश नाटकातून नैतिक मूल्यांचा संदेश देण्यात आला, तर मराठी नाटकातून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनसंघर्षाचे प्रभावी चित्रण करण्यात आले. विशेष म्हणजे ‘छावा’ चित्रपटातील अंगावर शहारे आणणारा प्रसंग विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सादर केला. यासाठी क्रीडा शिक्षक सॅम सर यांनी विशेष मेहनत घेतली.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी न्यू व्हिजन स्कूलचा ‘व्हिजन महोत्सव’ एक आदर्श उपक्रम ठरला, अशी भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली.



