विद्यार्थी शिस्तीसाठी पालकांची पुढाकाराची भूमिका , इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यास शिस्त लागावी म्हणून पालकांची शाळेस लेखी संमती
![]()
विद्यार्थी शिस्तीसाठी पालकांची पुढाकाराची भूमिका
इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यास शिस्त लागावी म्हणून पालकांची शाळेस लेखी संमती
परभणी प्रतिनिधी
अंबिका नगर, परभणी येथील आकाशकन्या कल्पना चावला प्राथमिक शाळेत एक लक्षवेधी व चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली असून, विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत पालकांनी घेतलेली सकारात्मक व जबाबदार भूमिका सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
शाळेचे मुख्याध्यापक महोदय यांना श्री. देविदास तुकाराम शिंपले (रा. बोरी, धनगर गल्ली, ता. जिंतूर, जि. परभणी) यांनी लेखी अर्ज सादर करत आपल्या मुलास शिस्त लावण्यासाठी शाळेस थेट लेखी संमती दिली आहे. त्यांचा मुलगा चि. निशांत देविदास शिंपले हा सध्या सदर शाळेत इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत आहे.
सदर अर्जामध्ये पालकांनी नमूद केले आहे की, सध्या शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा न करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आहेत. मात्र, या निर्णयाचा गैरफायदा घेऊन विद्यार्थी बेशिस्त वागण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः आपल्या पाल्याच्या बाबतीत शालेय शिस्त भंग होऊ नये, तसेच भविष्यात तो चुकीच्या मार्गाला लागू नये, यासाठी पालकांनी स्वतःहून पुढाकार घेत शाळेस लेखी संमती दिली आहे.
पालकांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, विद्यार्थ्याच्या चुका लक्षात घेऊन योग्य त्या शिस्तीच्या चौकटीत शिक्षा केल्यास त्याबाबत कोणतीही तक्रार करण्यात येणार नाही. तसेच आई-वडील व विद्यार्थी स्वतः याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार, वाद किंवा आक्षेप घेणार नसल्याची लेखी हमी देण्यात आली आहे.
या अर्जावर सौ. गंगासागर देविदास शिंपले (अर्जदार) यांची सही असून, पाल्याने शिस्तबद्ध जीवन जगून देशाचा आदर्श नागरिक बनावा, हीच आपली प्रामाणिक अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता, विद्यार्थी शिस्त, पालकांची जबाबदारी आणि शाळा–पालक समन्वय याबाबत समाजास सकारात्मक संदेश देणारी ठरत आहे. शिक्षणासोबत संस्कार महत्त्वाचे आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारे हे उदाहरण ठरत आहे.


