मेहनत, जिद्द आणि शिष्यवृत्तीच्या बळावर अमळनेरच्या वैष्णवी पाटीलचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यश  ऑक्सफर्ड परिषदेत संशोधन सादरीकरण; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वाटचाल
1 min read

मेहनत, जिद्द आणि शिष्यवृत्तीच्या बळावर अमळनेरच्या वैष्णवी पाटीलचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यश ऑक्सफर्ड परिषदेत संशोधन सादरीकरण; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वाटचाल

Loading

मेहनत, जिद्द आणि शिष्यवृत्तीच्या बळावर अमळनेरच्या वैष्णवी पाटीलचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यश

ऑक्सफर्ड परिषदेत संशोधन सादरीकरण; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वाटचाल

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
मेहनत, सातत्य आणि संधींचा योग्य वापर केल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येत नाही, हे अमळनेर येथील वैष्णवी पाटील हिने आपल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यशातून सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून शिक्षण घेत तिने जागतिक पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले असून तिचा शैक्षणिक प्रवास आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे.

वैष्णवी पाटील हिने दहावीपर्यंतचे शिक्षण ग्लोबल व्ह्यू स्कूल, अमळनेर येथे पूर्ण केले. सन २०१८ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने शासकीय पॉलिटेक्निक, जळगाव येथे माहिती तंत्रज्ञान (आयटी) शाखेत पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. गुणवत्तेच्या आधारे तिला शिक्षण शुल्क सवलत योजनेअंतर्गत प्रवेश मिळाला होता.

यानंतर तिने पुणे येथील नामांकित सिंहगड अभियांत्रिकी संस्थेत माहिती तंत्रज्ञान शाखेत अभियांत्रिकी पदवी संपादन केली. हे संपूर्ण शिक्षण विविध शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून पूर्ण झाले. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच तिला नोकरीची संधी मिळाली होती; मात्र उच्च शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरित होत तिने परदेशात शिक्षण घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

त्यानुसार तिने इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात ‘डेटा सायन्स अँड अ‍ॅनालिटिक्स’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. हे विद्यापीठ जगातील अग्रगण्य शंभर विद्यापीठांपैकी एक मानले जाते. तिच्या गुणवत्तेची दखल घेत तिला ‘इंडियन एक्सलन्स स्कॉलरशिप’ मिळाली.

पदव्युत्तर शिक्षणादरम्यान तिने युनायटेड किंगडममधील स्वयंसेवी संस्थांच्या टिकाव क्षमतेवर आधारित संशोधन प्रबंध सादर केला. या प्रकल्पाच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत तिला ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय डेटा परिषदेत आपले संशोधन मांडण्याची मानाची संधी मिळाली.

लहान वयात वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने एकहाती कुटुंबाचा भार सांभाळत वैष्णवीच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच नातेवाइकांचा व कुटुंबीयांचा सातत्यपूर्ण पाठिंबा तिला लाभला. कठीण परिस्थितीतही जिद्द, सातत्य, योग्य मार्गदर्शन आणि शिष्यवृत्तीचा योग्य वापर केल्यास यश निश्चित मिळते, हा संदेश वैष्णवी पाटील हिच्या यशस्वी वाटचालीतून स्पष्टपणे समोर येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *