उडालेली पाखरे तब्बल ३० वर्षांनी परतली शाळेत , भडणे येथील कै. सी. बी. देसले विद्यालयात 1994–95 बॅचचा भावनिक स्नेहमेळावा संपन्न
![]()
उडालेली पाखरे तब्बल ३० वर्षांनी परतली शाळेत
भडणे येथील कै. सी. बी. देसले विद्यालयात 1994–95 बॅचचा भावनिक स्नेहमेळावा संपन्न
शिंदखेडा प्रतिनिधी :
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै. सी. बी. देसले माध्यमिक विद्यालय या शाळेच्या प्रांगणात तब्बल तीस वर्षांनंतर एक भावनिक, स्मरणरंजन करणारा क्षण अनुभवायला मिळाला. सन 1994–95 या बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन केले.
ज्या शाळेच्या प्रांगणात कधी खेळ, मस्ती, अभ्यासाचे धडे आणि संस्कार रुजले, त्याच प्रांगणात पुन्हा एकत्र येण्याचा आनंद शब्दात मांडता येणार नाही, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. “माझी शाळा, माझे शिक्षक आणि माझे मित्र” या भावनेने भारलेला हा स्नेहमेळावा सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी. आर. पाटील हे होते. यावेळी डी. जी. पाटील, ए. व्ही. निकम, ए. पी. देसले, आर. एम. बैसाणे, एस. आर. वेडे, मंगला बोरसे, कल्पना चव्हाण, सुरेखा महाले, जीवन पाटील, सारंग पाटील, वेडे मॅडम आदी शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
श्रद्धांजली व आठवणींचा जागर
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर दिवंगत शिक्षक एन. डी. पाटील, बी. डी. देसले, जे. के. बोरसे, सूर्यवंशी सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून शालेय जीवनातील गमती-जमती, शिक्षकांचे शिस्तप्रिय व प्रेमळ स्वभाव, तसेच त्यांच्या जीवनावर झालेले संस्कार यांचा मनमोकळा पाढा वाचला. “आम्ही जरी पडक्या इमारतीत शिकलो, तरी आमच्यावर झालेले संस्कार एवढे भक्कम होते की आज आम्ही कुटुंब, समाज आणि नात्यांमध्ये मूल्य जपतो,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
शिक्षकांप्रती कृतज्ञता
“आज आमची मुले आधुनिक, दुमजली आणि एसीच्या शाळांत शिकत असली, तरी त्यांची घडण याच शाळेतील शिक्षकांनी घडवली,” असे सांगताना अनेक माजी विद्यार्थी गहिवरून गेले. शिक्षक हेच खरे जीवन घडवणारे शिल्पकार आहेत, याची प्रचिती या स्नेहमेळाव्यात आली.
मुख्याध्यापक गोकुळ पाटील व ए. व्ही. निकम यांनी मार्गदर्शन करताना, आई-वडिलांवर प्रेम, आपुलकी व सन्मान ठेवा, हीच खरी शिक्षणाची पावती आहे, असे सांगितले.
भेटवस्तू व सामाजिक बांधिलकी


यावेळी शाळेतील विद्यार्थिनी माया वाणी व चित्रकला देसले यांनी संपूर्ण बॅचला भेटवस्तू दिल्या, तर माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थिनीला साडी भेट देऊन सन्मान केला. तसेच ग्रुपमधील कोणालाही अडचण किंवा संकट आल्यास मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प करण्यात आला.
याशिवाय, आपण ज्या शाळेत घडलो त्या शाळेसाठी भविष्यात मोठी भेटवस्तू देण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले.
आयोजनात योगदान
हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा. पंकज देसले, जितेंद्र ठाकरे, विशाल बागुल, दीपक माळी, जितेंद्र मंगळे, भगवान पाटील, छोटू शिंदे, माया वाणी, चित्रकला देसले, अनिता माळी, सुलोचना देसले, वैशाली करणकाळ तसेच सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.
हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ भेट नव्हे, तर शाळा, शिक्षक आणि संस्कार यांच्याशी असलेले नाते पुन्हा जिवंत करणारा एक अविस्मरणीय क्षण ठरला.

