सातारा साहित्य संमेलनात खान्देशचा साहित्यिक गौरव , गझलकार शरद धनगर यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड
1 min read

सातारा साहित्य संमेलनात खान्देशचा साहित्यिक गौरव , गझलकार शरद धनगर यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड

Loading

सातारा साहित्य संमेलनात खान्देशचा साहित्यिक गौरव

गझलकार शरद धनगर यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड

अमळनेर प्रतिनिधी
दिनांक १ ते ४ जानेवारी या कालावधीत सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध कवी–गझलकार शरद धनगर यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनातील ‘गझल कट्टा’ मंचावर खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष असलेले कवी–गझलकार शरद धनगर यांना गझल सादरीकरणासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या तरन्नूम विशेष मुशायऱ्यात ते आपल्या दर्जेदार गझलांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. हा मुशायरा दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.
शरद धनगर हे केवळ कवी–गझलकारच नव्हे तर खान्देशी साहित्य चळवळीचे प्रभावी नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. यापूर्वी त्यांनी सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात विविध साहित्य संमेलनांमध्ये त्यांना सातत्याने निमंत्रित केले जाते.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे साहित्य अकादमी, नवी दिल्ली येथे आयोजित ‘साहित्योत्सव’ या राष्ट्रीय साहित्य महोत्सवात त्यांना अहिराणी कविता सादर करण्यासाठी निमंत्रण प्राप्त झाले होते, ही खान्देशी भाषेसाठी अभिमानाची बाब मानली जाते.
या मानाच्या निवडीबद्दल खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी तसेच संघातील पदाधिकारी व साहित्यप्रेमींनी शरद धनगर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
खान्देशच्या साहित्यिक परंपरेचा गौरव वाढवणारी ही निवड निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *