मारवड जि. प. कन्याशाळेत साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी , बाल श्याम व श्यामची आईच्या सजीव सादरीकरणातून संस्कारांचा जागर
1 min read

मारवड जि. प. कन्याशाळेत साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी , बाल श्याम व श्यामची आईच्या सजीव सादरीकरणातून संस्कारांचा जागर

Loading

मारवड जि. प. कन्याशाळेत साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी

बाल श्याम व श्यामची आईच्या सजीव सादरीकरणातून संस्कारांचा जागर

अमळनेर प्रतिनिधी

जिल्हा परिषद कन्याशाळा, मारवड येथे पूज्य साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक व संस्कारक्षम वातावरणात पार पडला. साने गुरुजी जयंतीच्या निमित्ताने जणू बाल श्याम व श्यामची यशोदा आई शाळेच्या प्रांगणात अवतरल्याचा प्रत्यय उपस्थितांना आला.

गायन, वक्तृत्त्व व नाट्यकृतीतून गुरुजींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन

दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमात ‘श्यामची आई’ या अजरामर ग्रंथातील “मनाची स्वच्छता” या प्रसंगावर आधारित नाट्यकृती सादर करण्यात आली. त्यासोबतच बाल वक्त्यांच्या प्रभावी भाषणमालिका व साने गुरुजींच्या हृदयस्पर्शी गीतांच्या सादरीकरणातून गुरुजींच्या जीवनकार्याचा भावस्पर्शी आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म’ या वैश्विक प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर पूज्य गुरुजींच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या ‘बलसागर भारत होवो’ या समूहगायनासह ‘वारा वदे कानामध्ये… हसरे माझ्या मुला’ यांसारख्या भावगीतांनी कार्यक्रमात प्रसन्न वातावरण निर्माण झाले.

बाल वक्त्यांच्या प्रभावी भाषणांनी वेधले लक्ष

बाल वक्त्यांच्या भाषणमालिकेत मनस्वी पाटील, श्रेया पाटील, दिव्या चौधरी, फाल्गुनी पाटील, स्वरा पाटील, तमन्ना पाटील, तनिष्का पाटील आदी विद्यार्थिनींनी साने गुरुजींच्या जीवनकार्य, त्यांचे सामाजिक योगदान व मूल्याधिष्ठित विचार यावर उत्कृष्ट भाषणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

‘मनाची स्वच्छता’ नाट्यकृतीने दिला संस्कारांचा संदेश

यानंतर ‘श्यामची आई’ पुस्तकातील ‘मनाची स्वच्छता’ या संस्कारक्षम प्रसंगावर आधारित नाट्यकृती सादर करण्यात आली. यात इयत्ता दुसरीची प्रेक्षा साळुंखे हिने छोटा श्याम तर इयत्ता चौथीची दिव्यानी शिंदे हिने श्यामची आई ही भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली.
“पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप” हा संदेश विद्यार्थिनींनी अत्यंत सहजतेने सादर करत उपस्थितांच्या मनात संस्कारांची गोडी निर्माण केली.

मान्यवरांची उपस्थिती व यशस्वी आयोजन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली दिव्यानी शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून बाल श्यामची भूमिका साकारणारी प्रेक्षा साळुंखे उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे व उपशिक्षिका चेतना बिऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिक्षणमंत्री गायत्री बडगुजर व सांस्कृतिक मंत्री फाल्गुनी पाटील यांनी केले, तर क्रीडामंत्री मानसी शिंदे हिने आभार प्रदर्शन केले.

संयुक्त प्रयत्नांतून कार्यक्रम यशस्वी

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय सोनवणे, चेतना बिऱ्हाडे, सुधीर पाटील, शापोआ स्वयंपाकी उषाबाई कोळी, शालेय मंत्रिमंडळ तसेच पालकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *