देवगाव देवळीला विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्त भारताची शपथ; ब्रह्माकुमारींच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने जनजागृतीचा जागर
![]()
देवगाव देवळीला विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्त भारताची शपथ; ब्रह्माकुमारींच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने जनजागृतीचा जागर
अमळनेर प्रतिनिधी :
“व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार!” या प्रभावी संदेशासह दहा कोटी नशामुक्त प्रतिज्ञा महाभियान (६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२६) अंतर्गत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, ओम शांती सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा जोतीराव फुले हायस्कूल व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, देवगाव-देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती जनजागृती व व्यसनमुक्ती कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यक्रमात मुख्य प्रशासिका आदरणीय विद्या दीदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना संबोधित करताना व्यसनाचे भीषण परिणाम अत्यंत प्रभावी शब्दांत मांडले. त्या म्हणाल्या, “क्षणिक आनंदासाठी लावलेले व्यसन संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत असून त्यामागे व्यसन हे मोठे कारण आहे. परमेश्वराने दिलेले हे अमूल्य शरीर दोनशे कोटी रुपयांपेक्षाही मौल्यवान आहे. त्यामुळे त्याचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “प्राचीन भारत संस्कार, संयम आणि सदाचारासाठी ओळखला जात होता. आज पुन्हा व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. आजची मुलेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना व्यसनापासून दूर ठेवू शकतात. पंजाबसारख्या राज्यांमध्ये व्यसनामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे ‘मी व्यसन करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही’ हा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे. आपले ध्येय गाठायचे असेल तर व्यसनापासून कायम दूर राहणे आवश्यक आहे.”
व्यसनमुक्तीसाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ओम शांती केंद्रात समुपदेशन व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध असून, योग्य मार्गदर्शनाने व्यसन सहज सोडता येते, असेही त्यांनी सांगितले.
यानंतर महात्मा जोतीराव फुले हायस्कूल व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापकांना नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत “मी नशा करणार नाही, इतरांनाही नशामुक्त जीवनासाठी प्रेरित करीन.” अशी शपथ घेतली.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प कृतीत उतरविण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, ओम शांती सेंटरच्या मुख्य प्रशासिका विद्या दीदी, लता माता महाजन, देवळीकर माताजी, प्रकाश पाटील, विमल माताजी, लता माताजी (देवळी), रामकोर माताजी (देवळी), महात्मा फुले हायस्कूलचे संचालक धर्मराज पाटील, गडखांब केंद्रप्रमुख महेश पाटील, महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक मोरे, शिक्षक ईश्वर महाजन, सुरेश महाजन, हरी माळी,लिपिक देवेश पाटील तसेच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ. रेखा अरविंद सोनवणे, श्री. राजेंद्र पांडुरंग पाटील, श्रीमती गायत्री हिम्मतराव पाटील, श्री. दीपक वसंतराव सोनवणे, श्रीमती कल्पना सुरेश साळुंखे यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले. “नशामुक्त समाज, निरोगी भारत” ही संकल्पना प्रत्येकाने केवळ प्रतिज्ञेपुरती न ठेवता ती आपल्या दैनंदिन जीवनात कृतीत उतरवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. “आज घेतलेली नशामुक्तीची शपथ ही प्रत्येकाच्या उज्ज्वल, निरोगी आणि व्यसनमुक्त भविष्याची नवी सुरुवात ठरो,” असा आशावाद व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.


