करुणा क्लबच्या माध्यमातून संवेदनशील, संस्कारक्षम पिढी घडविण्याचा संकल्प , प्रताप हायस्कूलमध्ये अमळनेर तालुक्यातील करुणा संघटक शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात; भूपेशजी चारण यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
करुणा क्लबच्या माध्यमातून संवेदनशील, संस्कारक्षम पिढी घडविण्याचा संकल्प
प्रताप हायस्कूलमध्ये अमळनेर तालुक्यातील करुणा संघटक शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात; भूपेशजी चारण यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी) : प्रताप हायस्कूल, अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय करुणा केंद्र, चेन्नई यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील करुणा क्लब संघटक शिक्षकांची एकदिवसीय सहविचार सभा व कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पंचायत समिती अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेस आंतरराष्ट्रीय करुणा केंद्राचे उत्तर महाराष्ट्र क्षेत्र प्रमुख व मुख्य समन्वयक भूपेशजी चारण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यशाळेत करुणा क्लबच्या माध्यमातून शालेय स्तरावर राबविण्यात येणारे विविध उपक्रम, मूल्यशिक्षण, जीवदया, पर्यावरण संरक्षण, प्राणीमात्रांविषयी करुणा, अहिंसा आणि शाकाहारी जीवनशैली याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी करुणा क्लबची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून शालेय शिक्षणासोबत मानवी मूल्यांची जोपासना होणे काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
नैतिक मूल्यांचा ऱ्हास ही चिंतेची बाब – भूपेशजी चारण
करुणा क्लबचे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक भूपेशजी चारण यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात आजच्या समाजासमोरील नैतिक मूल्यांच्या ऱ्हासाबद्दल चिंता व्यक्त केली. भ्रमणध्वनीचा वाढता व अनावश्यक वापर, संकुचित मनोवृत्ती, विभक्त कुटुंब पद्धती आणि वाढती स्वार्थी वृत्ती यामुळे समाजातील माणुसकी कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुलांना केवळ शालेय शिक्षण नव्हे, तर मूल्यशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
महापुरुषांचे विचार आणि त्यांचे कार्य हेच समाजासाठी खरे आदर्श असल्याचे सांगताना त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी सोसलेल्या संघर्षाची भावपूर्ण आठवण करून दिली. प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, पर्यावरणाचे संरक्षण करावे आणि निरोगी जीवनासाठी शाकाहारी आहाराचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित शिक्षकांना केले.
करुणा ही मानव, प्राणी आणि निसर्गासाठीही असावी –गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील
अध्यक्षीय मनोगतात गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी, “ज्या प्रताप हायस्कूलमध्ये राष्ट्रसंत साने गुरुजी शिक्षण घेतले, त्या संस्कारमय शाळेचा मी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे,” असे सांगत शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संस्कारांचे विद्यापीठ असल्याचे अधोरेखित केले.
करुणा क्लबच्या माध्यमातून संवेदनशील, सुजाण आणि जबाबदार पिढी घडू शकते, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी आज पैसा वाढला असला तरी मनःशांती कमी झाली आहे, एकत्रित कुटुंब पद्धती लोप पावत आहे आणि शहरांमध्ये संवेदनशीलता कमी होत चालली असल्याचे सांगितले. मात्र ग्रामीण भागात आजही माणुसकी आणि संवेदनशीलतेचे जतन होत असल्याचे त्यांनी नमूद केले. करुणा ही केवळ माणसांपुरती मर्यादित न राहता प्राणी, पक्षी आणि निसर्गाविषयीही असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वृक्षारोपण केवळ छायाचित्रापुरते न ठेवता त्याचे संगोपन करणे महत्त्वाचे असून शाळांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांवर ताण निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
कार्यशाळेत दिनेश पालवे यांनी करुणा क्लबअंतर्गत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध विद्यार्थीहिताच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. प्रभाकर विंचूरकर (मुख्याध्यापक, पी. एन. मुंदडा विद्यालय) यांनी शालेय स्तरावरील करुणा क्लबचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि वार्षिक करुणा अधिवेशनाविषयी मार्गदर्शन केले. उपस्थित शिक्षकांनी आपल्या मनोगतातून करुणा क्लबचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा करुणा क्लब समन्वयक दिनेश पालवे यांनी केले. कार्यक्रमास अमळनेर तालुका करुणा क्लबचे प्रतिनिधी नरेंद्र पाटील,गोकुळ बोरसे, उमेश काटे,दिलीप पाटील, पक्षिमित्र जितेंद्र वाणी यांच्यासह तालुक्यातील सर्व करुणा संघटक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.


