मनुस्मृती दहन दिवस : समस्त महिला व बहुजन समाजाच्या मुक्तीचा ऐतिहासिक दिवस ,विषमतेविरुद्ध विवेकाची ज्वाला आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात
![]()
मनुस्मृती दहन दिवस : समस्त महिला व बहुजन समाजाच्या मुक्तीचा ऐतिहासिक दिवस
विषमतेविरुद्ध विवेकाची ज्वाला आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात
भारत देश सिंधू संस्कृतीमुळे जगात ओळखला गेला. उत्खननातून उघड झालेली ही संस्कृती मातृसत्ताक, समताधिष्ठित व मूल्यवर्धित होती. शेती, उद्योग, व्यापार, कला, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या सर्व क्षेत्रांत भारत प्रगत होता. सम्राट अशोकांनी बुद्धाच्या विवेकी व करुणावादी तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून देशाला उंचीवर नेले. नालंदा विद्यापीठासारख्या ज्ञानकेंद्रांमुळे भारत ज्ञानाचा महासागर होता.
परंतु परकीय आक्रमणांनंतर प्रतिक्रांती झाली. वैज्ञानिक व चिकित्सक विचार नष्ट करण्यात आले आणि त्यांच्या जागी अंधश्रद्धा, कर्मकांड व भोंदूपणा रुजवला गेला. विवेकाच्या अभावामुळे भारत संशोधनात, विशेषतः भौतिकशास्त्रासारख्या मूलभूत क्षेत्रांत मागे पडला. विवेकी विचार मांडणाऱ्या विचारवंतांवर हल्ले झाले, त्यांना संपवले गेले.
मनुस्मृती : विषमतेची धर्मग्रंथीय चौकट
भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले की मनुस्मृती हा ग्रंथ चातुर्वर्ण्य व जातीभेदावर आधारित विषमतावादी व्यवस्था अधिकृत करतो. ब्राह्मणांना सर्वोच्च, तर बहुजन समाजाला शूद्र ठरवून त्यांना कोणतेही अधिकार नाकारले गेले. कनिष्ठ जातीत जन्मलेला कितीही बुद्धिमान असला तरी त्याला सन्मान नव्हता.
इतिहास साक्षी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करतानाही “शूद्र” असा आक्षेप घेण्यात आला. छत्रपती शाहू महाराजांनाही वेदोक्त प्रकरणांत अपमान सहन करावा लागला. जेव्हा राजांना असा अन्याय सहन करावा लागला, तेव्हा सामान्य बहुजनांचे जीवन किती असह्य असेल याची कल्पना करता येते.
स्त्रियांचे शोषण आणि मौन
मनुस्मृतीच्या विचारसरणीत सर्वच समाजातील स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आले. विधवांना सन्मानाचे जीवन नाकारले गेले, सतीसारख्या अमानवी प्रथा अस्तित्वात होत्या. विधवांना धार्मिक विधींमधून हद्दपार करण्यात आले. अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य फारच थोड्यांकडे होते.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी काशीबाई नावाच्या पीडित स्त्रीला आत्महत्येपासून वाचवून तिच्या गर्भातील बाळाला दत्तक घेतले. हे कार्य त्या काळात केवळ फुल्यांसारख्या पुरोगामी विचारवंतालाच शक्य होते.
२५ डिसेंबर १९२७ : अन्यायग्रस्त समाजाचा निर्णायक क्षण
महात्मा फुल्यांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा सखोल अभ्यास केला—तीन वेळा वाचला. हा ग्रंथ मानवमूल्यांना नाकारतो, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणूनच २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृती दहन करण्यात आले. गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे यांच्या हस्ते हा विषमतावादी ग्रंथ जाळण्यात आला.
पुस्तकांवर अपार प्रेम असलेल्या, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक असलेल्या बाबासाहेबांनी ग्रंथ जाळला—कारण तो माणसा-माणसात भेद करणारा होता. ही कृती ज्ञानविरोधी नव्हती, तर अन्यायविरोधी होती. ती प्रतिकात्मक होळी होती—विषमतेच्या विचारांची.
संविधान : स्त्री आणि बहुजनांच्या स्वातंत्र्याचा पाया
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या मानवतावादी विचारांवर आधारित भारताचे संविधान निर्माण केले. जगातील सर्वात मोठे, धर्मनिरपेक्ष व मानवतावादी संविधान भारताला लाभले. न्याय, समता, बंधुता व स्वातंत्र्य ही त्याची मूल्ये आहेत.
मनुस्मृतीच्या विरोधात बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडले. त्यामुळे स्त्रियांना शिक्षण, मतदान, मालमत्तेचे हक्क व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला. मनुस्मृतीचे कायदे अस्तित्वात असते तर स्त्री शिक्षणाची कल्पनाही अशक्य होती.


आजची आव्हाने आणि वैचारिक जबाबदारी
आजही मनुस्मृतीचे विचार सूक्ष्म स्वरूपात बुवा-बाबा, पुरोहित, ज्योतिषी यांच्या माध्यमातून समाजात रुजवले जात आहेत. अंधश्रद्धांना खतपाणी घातले जात आहे. शिक्षणाचे खाजगीकरण, भांडवलदारांचे वर्चस्व आणि समान शिक्षणाचा अभाव भविष्यातील धोक्याची नांदी आहे.
बाबासाहेबांनी देवाऐवजी मानवाला केंद्रस्थानी ठेवले. मानवाचा विकास म्हणजेच देशाचा विकास—हा त्यांचा संदेश होता. त्यांनी स्वतःच्या संसारापेक्षा समाजाला प्राधान्य दिले आणि आपल्याला मुक्तपणे जगण्याचा अधिकार बहाल केला.
शपथ : विषारी विचारांना पुन्हा उगवू देणार नाही
मनुस्मृती दहन दिवस म्हणजे केवळ एका ग्रंथाचा निषेध नाही, तर अन्यायमुक्त समाजनिर्मितीची शपथ आहे. तथागत बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित जीवन जगणे हीच खरी मानवमुक्ती आहे.
समस्त महिलांनी व बहुजन समाजाने चिकित्सक विचार स्वीकारून अंधश्रद्धांच्या गुलामगिरीत पुन्हा अडकू नये.
आज या दिनी आपण शपथ घेऊया—
विषारी मनुस्मृतीला पुन्हा उगवू देणार नाही आणि समता, न्याय व मानवतेवर आधारित समाज घडवू.
✍️ पत्रकार : एस. एच. भवरे

