महिलांच्या हक्कांसाठी मुंबईत विचारमंथन – अमळनेरची आधार संस्था सहभागी
1 min read

महिलांच्या हक्कांसाठी मुंबईत विचारमंथन – अमळनेरची आधार संस्था सहभागी

Loading

महिलांच्या हक्कांसाठी मुंबईत विचारमंथन – अमळनेरची आधार संस्था सहभागी

अमळनेर प्रतिनिधी :
समाजातील स्त्रीवादी परिवर्तनाला चालना देणारी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद यांची राज्यव्यापी परिषद मुंबई येथे भव्य स्वरूपात संपन्न होत आहे. ही परिषद २१, २२ व २३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये देशभरातील नामवंत स्त्रीवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व महिला चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते सहभागी होऊन महिलांच्या प्रश्नांवर सखोल विचारमंथन करणार आहेत.

या राज्यव्यापी परिषदेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था सहभागी झाली असून संस्थेच्या प्रतिनिधी रेणू प्रसाद व ज्ञानेश्वरी पाटील यांनी परिषदेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. महिलांचे हक्क, लैंगिक समानता, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समता, स्त्री अत्याचार विरोधी चळवळ, आर्थिक स्वावलंबन, शिक्षण व आरोग्य यांसारख्या विविध विषयांवर परिषदेत सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद ही गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या हक्कांसाठी व समाजपरिवर्तनासाठी कार्यरत असून, स्त्रियांच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या परिषदेमार्फत केले जाते. या परिषदेतून स्त्रीवादी चळवळीचे धोरण, भविष्यातील दिशा व कृती कार्यक्रम निश्चित केले जाणार आहेत.
अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेच्या प्रतिनिधींच्या सहभागामुळे तालुका व जिल्हा पातळीवरील महिलांच्या प्रश्नांना राज्यस्तरावर मांडण्याची संधी मिळणार असून, स्थानिक पातळीवरील अनुभव व प्रश्न या परिषदेत प्रभावीपणे मांडले जाणार आहेत. ही बाब अमळनेर व जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
राज्यभरातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी ही परिषद स्त्री मुक्तीच्या लढ्याला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *