अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धेचा जागर – पूजन व माल्यार्पण सोहळा उत्साहात संपन्न
![]()
अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धेचा जागर – पूजन व माल्यार्पण सोहळा उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी :
राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेर युवा परीट (धोबी) मंडळाच्या वतीने पूजन व माल्यार्पण सोहळ्याचे भावपूर्ण आयोजन करण्यात आले. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भक्तीमय भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रथम संत गाडगेबाबा उद्यानातील स्मारकाचे, त्यानंतर संत गाडगेबाबा चौकातील स्मारकाचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. हा सोहळा धरणगाव–नांदेड येथील समाजबांधव अरुण अमृत वाघ, माजी नगरसेवक अविनाश जाधव, परशुराम महाले, परीट मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव विजय वाघ, प्रा. अनिल वाल्हे, प्रा. अनिल पवार, अशोक येशी, अनिल मांडोळे, डॉ. हिम्मत सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
राष्ट्रसंत गाडगेबाबा हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले थोर समाजसुधारक होते. दीन-दलित, पीडित, अपंग व अनाथांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधन घडत असे. अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा, अज्ञान यांवर त्यांनी कठोर प्रहार केला.
“देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कारांवर विश्वास ठेवू नका” अशी त्यांची शिकवण होती. “देव दगडात नसून तो माणसांत आहे” हा संदेश त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात ठसवला. समाजकार्याकरिता मिळालेल्या देणगीतून अनाथालये, धर्मशाळा, आश्रम व विद्यालये उभारून त्यांनी सेवाभावाचा आदर्श घालून दिला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदात्यांचा गौरव करण्यात आला. अमळनेर युवा परीट (धोबी) मंडळाच्या वतीने रक्तदात्यांना राष्ट्रसंत गाडगेबाबांची प्रतिमा भेट देण्यात आली.
या कार्यक्रमास जाधव इंग्लिश क्लासेस चे संचालक विनोद जाधव सर, अनिल वाघ, गणेश नेरकर, भरत जावदेकर, दीपक सूर्यवंशी, मनोज चित्ते, दीपक वाल्हे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर करत सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारा हा सोहळा भावनिक वातावरणात संपन्न झाला.

