श्रमसंस्कार ते समाजसंस्कार : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम
![]()
श्रमसंस्कार ते समाजसंस्कार : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम
जळगांव प्रतिनिधी
जळगाव दि. २०/१२/२०२५ ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी ही केवळ स्मरणदिन न राहता विद्यार्थ्यांच्या हातून साकारलेली संस्कारयात्रा ठरली. स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या विचारांना शब्दांऐवजी कृतीची जोड देत, शाळा परिसरात श्रमदानाच्या माध्यमातून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या क्षणी उपस्थित शिक्षकवृंद व मान्यवरांनी नतमस्तक होऊन समाजस्वच्छतेसाठी आयुष्य वाहिलेल्या या थोर संताच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. या प्रसंगातून विद्यार्थ्यांमध्ये आदरभाव, कृतज्ञता व सामाजिक जाणिवेचे बीज रोवले गेले.
या उपक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे यांच्यासह श्री. दिगंबर पाटील, श्रीमती वर्षा चौधरी, श्रीमती पुनम कोल्हे, श्री. निर्मल चतुर, श्रीमती दिपाली खडके यांची उपस्थिती लाभली. सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत या उपक्रमास सहकार्य केले.
पुण्यतिथीच्या औचित्याने शाळेचे मैदान व परिसर विद्यार्थ्यांच्या श्रमातून उजळून निघाला. श्रीमती रोहिणी पाटील, श्री. विवेक मोरे व श्री. किशोर भोई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने श्रमदान केले. हातात झाडू घेऊन स्वच्छता करताना विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता ही सेवा आहे’ हा संदेश कृतीतून अधोरेखित केला.
या श्रमदानातून विद्यार्थ्यांना केवळ स्वच्छतेचा धडा नव्हे, तर श्रमप्रतिष्ठा, सामूहिक जबाबदारी, शिस्त समाजाभिमुख विचारांची जाणीव झाली. शाळेतील हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर श्रमसंस्कारांचे ठळक संस्कार उमटवणारा ठरला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोळी सर यांनी संयत, परिणामकारक व प्रेरणादायी शब्दांत केले. शिक्षकवृंदांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. संत गाडगेबाबा यांच्या विचारांची ज्योत विद्यार्थ्यांच्या कृतीतून उजळून निघाल्याचे चित्र या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आले.

